देशात मार्चपासून थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) लाखो लोक संक्रमित केले आहेत. यामध्ये सामान्य लोकांच्यासोबतच अनेक कलाकार व राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. आता माहिती मिळत आहे की, बीजेपीचे अध्यक्ष जे पी नड्डा (BJP President JP Nadda) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः नड्डा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून ते घरीच आयसोलेशनमध्ये असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर गुरुवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते डायमंड हार्बरला जात असताना हा हल्ला झाला होता.
आपल्या कोरोना विषाणू संसर्गाची माहिती जे पी नड्डा म्हणाले, ‘कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर, माझी चाचणी घेण्यात आली आणि अहवाल सकारात्मक आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून मी घरीच स्वतःला वेगळे ठेवले आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांत जो कोणी माझ्या संपर्कात आला असेल त्याने स्वत:ला वेगळे ठेवावे आणि स्वतःची तपासणी करुन घ्यावी.’
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है, डॉक्टर्स की सलाह पर होम आइसोलेशन में सभी दिशा- निर्देशो का पालन कर रहा हूँ। मेरा अनुरोध है, जो भी लोग गत कुछ दिनों में संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) December 13, 2020
जेपी नड्डा यांनी नुकताच पश्चिम बंगालचा दौरा केला. यावेळी त्यांनी सामाजिक अंतर राखले जाईल याची काळजी घेतली होती. तसेच ते सतत मास्क घालूनच वावरत होते. सर्वप्रथम, त्यांचे सहकारी आदित्यला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर, शनिवारी नड्डा यांच्या घशात खवखवणे सुरु झाले. अशा परिस्थितीत त्याची कोरोनाची चाचणी झाली आणि अहवाल सकारात्मक आला आहे. (हेही वाचा: भारतात लसीकरणाला जानेवारी पासून सुरुवात होण्याची शक्यता; ऑक्टोबर 2021 पर्यंत जनजीवन पूर्वपदावर येण्याचा Adar Poonawalla यांचा अंदाज)
दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये बरेच राजकारणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यात माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, स्मृती इराणी, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, श्रीपाद नाईक, रामदास आठवले, अर्जुन मेघवाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना कोरोनाची लागण झाली होती. यासह कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, अहमद पटेल, पीएल पुनिया आणि आरपीएन सिंह यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. अहमद पटेल यांचे नंतर कोरोना विषाणूमुळे निधन झाले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दासदेखील कोरोनासाठी पॉझिटिव्ह आढळले होते.