अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (President Joe Biden) सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येऊ शकतात. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. अमेरिकेतील दक्षिण-मध्य आशियाचे सहाय्यक परराष्ट्र सचिव डोनाल्ड लू यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सप्टेंबरमध्ये भारत भेटीसाठी उत्सुक आहेत.
लू पुढे म्हणाले की, भारत-अमेरिका संबंधांसाठी 2024 हे ‘मोठे वर्ष’ असणार आहे. तसेच G-20 मधील भारताच्या नेतृत्वाने जगात एक शक्ती म्हणून उभे राहण्याची देशाची क्षमता आणखी वाढवली आहे. भारत G-20 चे यजमानपद अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे. आमचे अनेक क्वाड सदस्य नेतृत्वाची भूमिका घेत आहेत. हीच गोष्ट आपल्याला जवळ आणण्याची संधी देते.’
हवामान बदलावरील महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत आणि इतर देशांसोबत काम करण्याचा संकल्प करून डोनाल्ड लू म्हणाले की, या संकटाचा सामना करण्यात जगाचे यश हे अंशतः भारताने घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असेल. डोनाल्ड लू म्हणाले, भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील लोकशाहीला पाठिंबा देण्यासाठी पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतात कोणतीही गोष्ट गुप्त ठेवली जात नाही. तुमच्याकडे लोकशाही आहे कारण तुमच्याकडे स्वतंत्र प्रेस आहे जी प्रत्यक्षात काम करते.
डोनाल्ड लू म्हणाले की, बिडेन यांच्या भारत भेटीबद्दल अमेरिका खूप उत्साहित आहे. यामध्ये परराष्ट्र सचिव टोनी ब्लिंकन, ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन आणि कॉमर्स सेक्रेटरी जीना रायमोंडो हे देखील भारताला भेट देणार आहेत. या वर्षातील केवळ तीन महिने उलटले आहेत व पुढे अजून बरेच काही येणे बाकी आहे. (हेही वाचा: मोदींनी Danish Prime Minister Frederiksen यांना केला फोन, हरित धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा घेतला आढावा)
मार्चमध्ये, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या प्रकारची जाहीर सभा प्रथमच क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झाली ज्यामध्ये हे चार देश एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येत असल्याचे स्पष्ट झाले.