Sharjeel Imam Arrested (Photo Credits: ANI)

दिल्लीच्या शाहीन बागेत नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारा, जेएनयूचा माजी विद्यार्थी शरजील इमाम (Sharjeel Imam) गेल्या काही दिवसांपासून फरार होता. बिहार, उत्तरप्रदेश सोबत दिल्ली पोलीसही इमामच्या मागावर होते. अखेर शरजीलला पोलिसांनी बिहारच्या जहानाबाद (Jahanabad) येथून अटक केली आहे. यापूर्वी त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शरजीलचा शोध घेण्यासाठी गठित पाच पथकांनी मुंबई, दिल्ली, पाटणा अशा अनेक ठिकाणी छापा टाकला.

दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या एका उच्च अधिकाऱ्याने शरजील हा नेपाळला पळून गेला असल्याची शंका व्यक्त केली होती. सोमवारी रात्री तो पोलिसांच्या रडारवरून गायब झाला असल्याची माहिती मिळाली होती. अखेर आज त्याला बिहार येथून अटक करण्यात आली.

आसामला भारतापासून वेगळे करा या मुद्द्यावर भर देत इमामने भाषण दिले होते. त्याचे हे भाषण फारच वादग्रस्त ठरले होते. त्यानंतर शरजील इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. इमामच्या भाषणाचा व्हिडीओ समोर आल्यावर त्याच्या अटकेची कारवाई सुरु झाली. मात्र त्यानंतर शरजील भूमिगत होता. शरजीलचे कुटुंब मूळचे बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील काकोचे आहे. शरजीलचे वडील अकबर इमाम जेडीयू नेते होते. काही वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. सीएम नितीशकुमार यांचे निकटवर्ती असलेले अकबर इमाम यांनी, 2005 मध्ये जहानाबाद सीटवरून जेडीयूच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. (हेही वाचा: JNU चा माजी विद्यार्थी शरजील इमाम देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यावर फरार; शिरच्छेद केल्यास हिंदू नेत्याकडून 1 कोटीचे बक्षीस)

फरार शरजील इमाम याला अखेर 25 जानेवारी 2020 रोजी संध्याकाळी 7-8 वाजता, बिहारच्या फुलवारी शरीफ येथे झालेल्या बैठकीत पाहिले गेले होते. त्यानंतर तो पोलिसांच्या रडारवरून बेपत्ता होता. दरम्यान, जेएनयूच्या सेंटर फॉर हिस्ट्री स्टडीजमधून पीएचडी घेत असलेल्या शरजीलने, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात दिलेल्या विद्रोही भाषणामुळे दिल्ली, आसामसह चार राज्यांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.