झारखंडच्या (Jharkhand) साहिबगंज जिल्ह्यात दिल्लीतील श्रद्धा हत्येसारखे प्रकरण समोर आले आहे. एका आदिवासी व्यक्तीने आपल्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले, ‘साहिबगंज येथील 22 वर्षीय आदिवासी महिलेच्या मृतदेहाचे 12 तुकडे सापडले आहेत. मृतदेहाच्या डोक्यासह काही भागांचा शोध सुरू आहे. आरोपी पती दिलदार अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले आहे, मृत ही त्याची दुसरी पत्नी होती.’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (17 डिसेंबर) सायंकाळी 6 वाजता संथाली मोमीन टोला परिसरातील एका जुन्या घरातून एका महिलेचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला. आरोपी या महिलेला लग्नाच्या बहाण्याने इथे घेऊन आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रूबिका पहाडीन असे पीडितेचे नाव असून तिचा पती दिलदार अन्सारी याने तिची हत्या केली होती. अहवालानुसार 10 दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते.
The deceased was chopped off into 18 pieces. As far as the question as to who was involved as the accused, the investigation is going on: Sudarshan Prasad Mandal, DIG Santhal on woman murdered and chopped off in Sahibganj, Jharkhand pic.twitter.com/YJG5qACTmC
— ANI (@ANI) December 18, 2022
पोलिसांनी सांगितले की, रुबिका ही दिलदारची दुसरी पत्नी असून दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रुबिका अचानक गायब झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे संपर्क साधला. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना रुबिकाचा मृतदेह सापडला. आरोपीने इलेक्ट्रिक कटरसारख्या धारदार वस्तूचा वापर करून महिलेच्या शरीराचे अनेक तुकडे केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा: जयपूरमध्ये श्रध्दा हत्याकांडासारखे कृत्य; आरोपीने मार्बल कटरने महिलेच्या मृतदेहाचे 10 तुकडे करून फेकले जंगलात)
या घटनेवरून राजकीय पक्षांमध्येही शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी भाजपने राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रतुल शाहदेव म्हणाले, ‘हेमंत सरकार यांच्या कार्यकाळात मुलींवरील अत्याचारात वाढ होत आहे. अल्पसंख्याक समाजातील काही लोक सातत्याने मुलींना लक्ष्य करत आहेत, मात्र सरकार कोणतीही पावले उचलत नाही. सरकारने ठोस पावले उचलली नाहीत आम्ही आमचे पाऊल उचलू.’