प्रेमी युगुलाला कपडे फाडून अर्धनग्न अवस्थेत बाजारात फिरवले; घटनेचा व्हिडिओ बनवून व्हॉट्सअॅपवर व्हायरल
Representative Image | (Photo credit: archived, edited, symbolic images)

झारखंड (Jharkhand) राज्यातील दुमका (Dumka) जिल्ह्यात असलेल्या सरैयाहाट पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या ककनिया गावात एका प्रेमी युगुलासोबत गावकऱ्यांनी अत्यंत लज्जास्पद वर्तन केले आहे. येथील गावकऱ्यांनी एका प्रेमी युगुलाला अर्धनग्न अवस्थेत बाजारातून फिरवले. तसेच, या घटनेचे व्हिडिओ शुटींग करुन ते व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) व्हायरलही केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

या प्रकाराबाबत माहिती देताना पोलीस अधिक्षक वाय एस रमेश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पीडितेच्या चुलत बहिणीचे बुधवारी लग्न होते होता. कुटुंबातील लोक लग्नाच्या विधीमध्ये व्यग्र होते. दरम्यान, त्याच दिवशी संध्याकाळी पीडिता एका युवकासोबत गावातील उसाच्या शेतात नको त्या अवस्थेत गावकऱ्यांच्या नजरेस पडली. या वेळी गावातील काही तरुणांनी या प्रेमी युगुलाला जोरदार मारहाण केली. या मारहाणीत पीडित युवक आणि पीडिता युवती यांच्या अंगावरील कपडेही फाडण्यात आले.

दरम्यान, अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी वाय एस रमेश म्हणाले, गावकऱ्यांनी या युगुलाला कपडे फाटलेल्या अवस्थेतच रात्रभर ठेवले. गुरुवारी सकाळी या दोघांना (युगुल) सरैयाहाट बाजारातून अर्धनग्न अवस्थेत फिरवत गावकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, ही घटना घडत असताना उपस्थितांपैकी काही लोकांनी या प्रकाराचे व्हिडिओ शुटींग केले. इतकेच नव्हे तर हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आला. (हेही वाचा, कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार; CCTV फुटेज मिळूनही पोलिसांची साक्षीदार महिलेकडे घटनेबाबत सविस्तर माहितीची मागणी)

सरैयाहाट पोलिसांनी पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे, पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहिता कलम 376 (2 एन) अन्वये प्राथमिक तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक रमेश यांनी या प्रकाराचा निशेध करताना म्हटले की, गावकऱ्यांचे हे वर्तन अतिशय लज्जास्पद आहे. हा प्रकार करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही रमेश म्हणाले.