
सध्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) सामना करण्यासाठी जगभरात सर्वजणच प्रयत्न करत आहेत. यासाठी अनेक देशांचे सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. भारतही सध्या अत्यंत नाजूक परिस्थितीमधून वाटचाल करीत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची (Janata Curfew) संकल्पना मांडली. या घोषणेकडे सर्वजणच गांभीर्याने पाहत आहेत. 22 मार्च, रविवारी सकाळी 7 वाजता जनता कर्फ्यू सुरु होईल. यामुळे 3,700 रेल्वे गाड्या, दिल्ली मेट्रो आणि एक हजार उड्डाणे रद्द करण्यात येणार आहेत. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट्सही बंद राहतील.
भारतीय रेल्वेच्या आदेशानुसार 22 मार्च रोजी, देशभरात चालणाऱ्या 2400 पॅसेंजर गाड्या आणि 1300 मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांसाठी केलेले बुकिंग रद्द मानले जाईल. त्यांचे सर्व पैसे प्रवाशांना परत केले जातील. मात्र, रविवारी सकाळी सात वाजता सुटणार्या प्रवासी गाड्यांना इच्छित स्थळी पोहचण्याची परवानगी देण्यात येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे लाखो लोक त्यांच्या घरातच राहतील आणि करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यात याची मदत होईल.
जनता कर्फ्यूच्या समर्थनार्थ इंडिगो आणि गोएअर या दोन देशांतर्गत विमान कंपन्याही उतरल्या आहेत. रविवारी गोएअरने सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, इडिगोने सांगितले आहे की या काळात केवळ 40% उड्डाणे होतील. अंदाजानुसार, दोन्ही कंपन्यांच्या निर्णयामुळे रविवारी सुमारे एक हजार उड्डाणे रद्द होणार आहेत. आज आणखी काही एअरलाईन्स देखील सार्वजनिक कर्फ्यूच्या समर्थनार्थ आपली उड्डाणे रद्द करणे अथवा कमी करण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: चंदीगड मध्ये एका तरुणीमुळे कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण)
डीएमआरसीने 22 मार्च रोजी दिल्ली मेट्रोच्या सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. जनता कर्फ्यू अंतर्गत 22 मार्च रोजी दिल्ली मेट्रो पूर्णपणे बंद होईल. काही काळासाठी दिल्ली मेट्रो पूर्णपणे बंद असण्याची ही कदाचित पहिली वेळ असेल. तसेच मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथे उपनगरीय रेल्वे सेवा कमी करण्यात येणार असल्याचेही रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.