50 हून अधिक दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या जलीस अंसारीला कानपूर येथे अटक; पॅरोलवर बाहेर आल्यावर होता फरार
जलीस अंसारी (Photo credit- PTI)

अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या, 69 वर्षीय जलीस अंसारी (Jalees Ansari) या कुख्यात दहशतवाद्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी कानपूर (Kanpur) येथून अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून 21 दिवसांची पॅरोल मिळाल्यानंतर, तो अजमेर तुरूंगातून बाहेर आला होता. मात्र पॅरोल संपण्यापूर्वी एक दिवस आधी तो बेपत्ता झाला होता. जलीस अंसारी याच्या मुलाने तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. कानपूरच्या मशिदीबाहेर त्याला अटक करण्यात आली. अंसारी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. अटकेनंतर त्याला लखनऊला आणले गेले आहे. चौकशीनंतर त्याला पुन्हा तुरूंगात पाठविण्यात येईल.

एसटीएफच्या म्हणण्यानुसार दहशतवादी जलिस अंसारी मुंबईहून पुष्पक एक्स्प्रेस गाडीने कानपूर येथे आला. येथे रेल्वे बाजार पोलिस स्टेशनच्या विश्वासूगंजमधील अप्पर मशिदीत तो गेला होता. तेथे त्याने आपले सामान आणि बॅग ठेवली आणि काही काळानंतर कानपूर सेंट्रल स्टेशन गेले. इथेच एसटीएफने त्याला ताब्यात घेतले. 26 वर्षानंतर आपल्याला पॅरोलवर बाहेर सोडले असल्याचे, जलिसने सांगितले. मात्र घरी पत्नी व मुलांबरोबर सतत भांडणे होत राहिल्याने त्याने कंटाळून घर सोडले होते. (हेही वाचा: मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील पॅरोल वर असणारा आरोपी जलीस अंसारी बेपत्ता; आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये कुटुंबीयांनी दाखल केली तक्रार)

कानपूर येथे आपल्या एका मित्राला भेटायला आलो असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्या मित्राचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जलिस 'डॉक्टर बॉम्ब' म्हणूनही प्रसिद्ध आहे. 1993 च्या राजस्थान बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्यावर 50 हून अधिक हल्ल्यांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. सध्या तो अजमेर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर असलेला अंसारी 1994 पासून तुरूंगात  होता.