Representational Image (Photo Credits: File Image)

सन 2019 मधील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) 26 डिसेंबर रोजी होते. जगातील अनेक ठिकाणी हे सूर्यग्रहण पाहिले गेले. मात्र यामुळे राजस्थानची राजधानी जयपूर (Jaipur) आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील, 14 मुलांच्या डोळ्यांचे 70 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. हे सूर्यग्रहण 26 डिसेंबर रोजी सकाळी 07.59 वाजता सुरू झाले आणि दुपारी 01.35 वाजता संपले. या कालावधीत एकूण 5 तास 36 मिनिटांमध्ये काही मुलांनी चष्मा किंवा सुरक्षा व्यवस्थेविना सूर्यग्रहण पाहिले. त्यानंतर काही मुलांना थोड्यावेळासाठी दिसणे बंद झाले, तर काही मुलांना अंधुक दिसू लागले.

गेल्या 20 दिवसांत राज्यातील सर्वात मोठ्या सवाई मानसिंग रूग्णालयात डझनहून अधिक अशा घटना घडल्या आहेत. यामध्ये मुलांसह काही मोठे लोकही सामील आहेत. सध्या रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील डॉक्टर सर्व बाधितांवर उपचार करण्यात व्यस्त आहेत आणि या मुलांची नजर पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. रुग्णालयाच्या नेत्र विभागाचे युनिट हेड, एचओडी कमलेश खिलनानी यांनी सांगितले की, 'सूर्यग्रहणामुळे डोळ्याचे नुकसान झालेल्या मुलांची नजर पुन्हा आहे तशी मिळवणे कठीण आहे. मुलांवर उपचार केले जात आहेत आणि लवकरच त्यांची दुरुस्ती केली जाईल, परंतु इतक्या वाईट रीतीने प्रभावित झालेल्या डोळयातील रेटीना पूर्ववत करणे फार अवघड आहे.' (हेही वाचा: सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी)

खिलनानी यांच्या म्हणण्यानुसार चष्मा आणि इतर सुरक्षा व्यवस्थेविना सूर्यग्रहण पहिल्याने या मुलांच्या डोळ्यांवर परिणाम झाला आहे. या मुलांच्या डोळयातील पडदा जळाला असून डोळ्यात पिवळ्या रंगाचे डाग दिसू लागण्याची समस्या उद्भवल्याचे तपासात समोर आले आहे. परंतु दृष्टी पूर्ववत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबरच्या सूर्यग्रहणानंतर गेल्या 20-25 दिवसात डझनाहून अधिक मुले सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल झाली आहेत.