जैन (Jain) धर्माचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजीला (Shri Sammed Shikharji) पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे, तिथे दारू व मांस विक्री, गुजरातच्या पालीताना मंदिराची (Palitana Temple) तोडफोड, त्या डोंगरावरील अवैध उत्खनन अशा अनेक कारणांमुळे जैन समाजातील लोक संतप्त झाले आहेत. आज त्यांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. तसेच जैन समाजातील 11 लोकांनी राजस्थानमधील अहिंसा सर्कल येथे सामूहिक मुंडण करून आपला याबाबत निषेध व्यक्त केला.
त्याचवेळी दिल्ली, मुंबई, गुजरातसह देशातील विविध शहरांमध्ये जैन समाजाच्या लोकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. महाराष्ट्र सरकारचे मंत्री खासदार लोढा आणि एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते.
Maharashtra | Members of Jain community protest in Mumbai against the decision of Jharkhand govt to declare 'Shri Sammed Shikharji' a tourist place and vandalisation of their temple in Palitana, Gujarat pic.twitter.com/FPYIKKTv0E
— ANI (@ANI) January 1, 2023
नुकतेच झारखंड सरकारने राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ डोंगरावरील श्री सम्मेद शिखरजी या जैन तीर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. आता हा निर्णय मागे घेण्याची मागणी जैन समाजातील लोक करत आहेत. जैन समाजाचे म्हणणे आहे की झारखंडने श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याने तेथे पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्यामुळे समेद शिखरचे नुकसान होईल. यामुळे जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. त्याचबरोबर गुजरातमधील पालिताना येथील जैन मंदिरात झालेल्या तोडफोडीलाही लोक विरोध करत आहेत. पालिताना येथील शत्रुंजय टेकडीवर हिंदू आणि जैन या दोन्ही धर्मीयांची तीर्थक्षेत्रे आहेत.
We support this Jain community protest and the Jharkhand government must rescind the decision & @CMOGuj must take strong action. https://t.co/Ngcdh88kFS
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) January 1, 2023
आज दिल्लीतील जैन समाजाचे लोक प्रगती मैदानावर जमले होते व त्यांनी इंडिया गेटकडे मोर्चा वळवला. झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी राष्ट्रपती भवनात निवेदन दिले. मुंबईतील जैन समाजाच्या आंदोलनात महाराष्ट्र सरकारचे मंत्री खासदार लोढा सहभागी झाले होते. जैन समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देत ओवेसी यांनी ट्विट केले की, ‘आम्ही जैन समाजाच्या लोकांना पाठिंबा देतो. झारखंड सरकारने निर्णय रद्द करावा.’ याआधी विश्व हिंदू परिषदेने (विहिप)ही जैन समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता. पार्श्वनाथ सम्मेद शिखरजींचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखली जावी, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते. तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर तिथे पर्यटकांसाठी दारू, मांस विक्रीसह अनेक सुविधा उपलब्ध होतील, असे जैन समाजातील लोकांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा: गुंटूर जिल्ह्यात TDP नेते एन चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू)
दुसरीकडे, गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील डोंगरावर असलेल्या पालिताना जैन तीर्थक्षेत्राबाबत समाजात प्रचंड असंतोष आहे. मंदिराच्या तोडफोडीमुळे जैन समाज संतप्त आहे. समाजातील लोकांचे म्हणणे आहे की, गुजरातमध्ये दारूबंदी आहे, मात्र येथे अवैधरित्या दारू विकली जात आहे. एवढेच नाही तर या डोंगराचे अवैध उत्खननही सुरू आहे. याप्रकरणी जैन समाज न्यायालयातही गेला असून न्यायालयाने धार्मिक भावना दुखावू नयेत, असे सांगितले आहे.