ITR 2021 Filing Deadline: करदात्यांना दिलासा; सरकारने वाढवली 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख, जाणून घ्या नवीन डेडलाईन
Income Tax Return File | (Images for symbolic purposes only। Photo Credits: pixabay)

आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरणाऱ्या लोकांनासाठी एक दिलासादायक बाब आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झाली सद्यस्थिती लक्षात घेता, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. 2020-2021 या वर्षासाठी वैयक्तिक आयकर विवरणपत्र (ITR) सादर करण्याची अंतिम मुदत सरकारने दोन महिन्यांपर्यंत वाढवली आहे. आता तुम्ही 30 सप्टेंबर 2021 पर्यंत आयकर परतावा भरू शकता. याआधी ही डेडलाईन 31 जुलै 2021 होती. सीबीडीटीने कंपन्यांना आयटीआर दाखल करण्याची मुदतही एका महिन्याने वाढवून 30 नोव्हेंबरपर्यंत केली आहे.

सीबीडीटीने म्हटले आहे की, वित्तीय वर्ष 2020-21 अर्थात मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी ज्यांनी अद्याप प्राप्तिकर परतावा (ITR Filing) भरला नाही, त्यांना काळजी करण्याचे कारण नाही. ही मुदत दोन महिने वाढवून 30 सप्टेंबर केली आहे. यासह सरकारने आणखीही मोठे निर्णय घेतले आहेत. त्याअंतर्गत सीबीडीटीने कर ऑडिट असेसीसाठी (Tax Audit Assessee) आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवून 31 ऑक्टोबर 2021 ऐवजी 30 नोव्हेंबर 2021 केली आहे. कर ऑडिट अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 वरून 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. (हेही वाचा: मे महिन्यात अखेरच्या 10 दिवसांत 'या' चार दिवशी बँका राहणार बंद)

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आता विलंब किंवा सुधारित आयकर विवरणपत्र भरण्यासाठी कालावधी 31 डिसेंबर 2021 ऐवजी 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविला आहे. एसएफटीचा कालावधी 31 मे 2021 वरून वाढवून 30 जून 2021 केला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीसाठी म्हणजे मार्च 2021 तिमाहीसाठी टीडीएस निवेदन सादर करण्याची अंतिम मुदत, 31 मे 2021 वरून 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना फॉर्म-16 देण्याची मुदतही सीबीडीटीने वाढविली आहे. आता ती 15 जून 2021 ऐवजी 15 जुलै 2021 करण्यात आली आहे.