'Item' Remark Row: कमलनाथ यांनी केलेल्या 'आयटम' टिपण्णीवर निवडणूक आयोगाने बजावली नोटीस; 48 तासांत मागितले उत्तर
कमलनाथ (Photo Credits: IANS)

निवडणूक आयोगाने (Election Commission) कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांना त्यांच्या 'आयटम' (Item) या शब्दाबाबत नोटीस पाठविली आहे. आयोगाने कमलनाथ यांना 48 तासांत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. मध्य प्रदेशातील 28 विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. अशात रविवारी ग्वाल्हेरच्या डबरा येथे निवडणूक सभेत कमलनाथ यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या, इमरती देवी यांचा उल्लेख ‘आयटम’ असा केला होता. तेव्हापासून भाजप त्यांच्याविरोधात सातत्याने हल्ले करीत आहे.

कमलनाथ यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगानेही (NCW) नोटीस पाठविली आहे. एनसीडब्ल्यूनेही यासंदर्भात कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. कमलनाथ यांनी भाजप नेत्या आणि राज्यमंत्री इमरती देवी यांना निवडणूक सभेत ‘आयटम’ म्हटले होते. भाजपाने कमलनाथ यांच्या अशा भाषेवर कडक टीका केली होती आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. अगदी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या प्रकारची भाषा त्यांना आवडली नाही, हे दुर्दैवी असल्याचे सांगितले होते.

इमरती देवी यांच्या विरोधात डाबरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचारावेळी कमलनाथ बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही टिपण्णी केली. त्यानंतर इमरती देवी खूप रडल्यादेखील होत्या. कमलनाथ यांनी आपल्या वक्तव्यावरील वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, आपला हेतू कोणाचा अपमान करण्याचा नाही त्यामुळे आपण माफी का मागावी? दुसरीकडे, इमरती देवी यांनीही कमलनाथ यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. ‘कमलानाथ बंगालहून आले आहेत, महिलांचा आदर करणे त्यांना माहित नाही,’ असे त्या म्हणाल्या होत्या. माध्यमांशी बोलताना त्या असेही म्हणाल्या की, कमलनाथ यांची आई-बहीण ही बंगालची आयटम आहे.