मकर संक्रांतीनिमित्त 7 ते 14 जानेवारी रोजी गुजरातमध्ये International Kite Festival चे आयोजन; 43 देशांतील पतंगवीर होणार सामील
International Kite Festival 2019 (Photo Credits: @InfoGujarat Twitter)

जर का तुम्हालाही पतंग (Kite) उडवण्याचा शौक असेल, तर तुम्ही 7 जानेवारीपासून गुजरातमध्ये सुरू होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात' (International Kite Festival) नक्की हजेरी लावा. दरवर्षी उत्तरायण म्हणजेच मकरसंक्रांतीच्या (Makar Sankrant) निमित्ताने गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित केला जातो. या वेळी हा उत्सव 7 जानेवारी रोजी सुरू होईल आणि 14 जानेवारीपर्यंत चालेल. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव मंगळवारी गांधीनगर शहरातील साबरमती रिव्हरफ्रंट येथे सुरू होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल या वेळी उपस्थित राहणार आहेत.

यासह राज्यभरातील विविध शहरांमध्येही पतंग महोत्सवाला सुरुवात होईल. या प्रसंगी 43 देशांतील 154 पतंगवीर, तसेच देशातील विविध राज्यांतील 115 पतंगवीर आपले कौशल्य दाखवतील. यावेळी 18 देशांचे उच्चायुक्तही उपस्थित असतील. 1989 मध्ये गुजरातच्या अहमदाबाद शहरात प्रथम आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यानंतर दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. हे उत्सवाचे 30 वे वर्ष आहे. (हेही वाचा: Makar Sankranti 2020: यंदा 15 जानेवारीला साजरी होणार मकर संक्रांत; जाणून घ्या पूजा मुहूर्त, वाहन आणि महत्व)

सोमवारी पतंगोत्सवाच्या आदल्या दिवशी राज्य पर्यटनमंत्री जवाहर चावडा यांच्या हस्ते, फूड कोर्ट, हस्तकला बाजार, थीम मंडप आणि क्राफ्ट मार्केटचे उद्घाटन झाले. चावडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतग महोत्सव वडोदरा आणि राजकोट येथे 8 जानेवारीला, केवडिया येथे 9 जानेवारीला (स्टॅच्यू ऑफ युनिटी कॅम्पस जवळील हेल्पिड ग्राऊंड) आणि 10 जानेवारी रोजी सूरत, 11 जानेवारीला सापुतारा व धोरडो, 12 जानेवारीला मेहसाणा येथे होणार आहेत.14 जानेवारीला अहमदाबादच्या पोलो येथे पतंगोत्सव होईल.