वाढत्या कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णालयांमधील सुविधा आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता भरून काढण्यासाठी नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाच्या अखत्यारीतील तीन रुग्णालये सुसज्ज आहेत. गोव्यातील INHS जीवंती, कारवारमधील INHS पतंजली, व मुंबई येथील INHS सांधणी या तीन रुग्णालयांमध्ये काही कोविड- ऑक्सिजन बेड्स स्थानिक नागरी प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
परिस्थितीमुळे अस्थायी कामगारांना त्यांच्या मूळच्या गावी परतण्यास भाग पडू नये म्हणून मुंबईत नौदल परिसरात काही मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नौदल प्रशासन सातत्याने नागरी प्रशासनाच्या संपर्कात असून कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी हवी असणारी कोणतीही मदत तातडीने उपलब्ध करून दिली जात आहे.
कारवारमधील नौदल अधिकाऱ्यांनीसुद्धा जवळपास 1500 अस्थायी कामगारांना धान्य, औषधांसहीत अनेक जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. गेल्यावर्षी INHS पंतजली हे स्थानिक कोविड रुग्णांना उपचार देणारे पहिले लष्करी रुग्णालय होते. आताही हे रुग्णालय तत्परतेने कोविड रुग्णांना उपचार पुरवेल.
गोवा नौदल चमूने कोविड-19 च्या पहिल्या लाटेत सामुदायिक स्वयंपाकघरे उपलब्ध करून दिली होती, आताही गरज भासल्यास तश्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गोवा नौदल मुख्यालय परिसरातील INHS जीवंती या रुग्णालयात काही ऑक्सिजन बेड्स सामान्य रुग्णांसाठी उपलब्ध आहेत आणि नागरी प्रशासनाकडून आलेल्या मागणीनुसार सरकारी रुग्णालयांनाही प्राणवायू पुरवठा केला जाईल.
गुजराथ नौदल विभागाने गरजूंसाठी सामुदायीक स्वयंपाकघरे, कोविड संसर्ग पसरलेल्या भागात जीवनावश्यक वैद्यकीय उपकरणे वा मालाच्या वाहतूकीसाठी सहकार्य तसेच गरज भासल्यास इतर तांत्रिक मदत देऊ केली आहे.
सध्या सर्व नौदल रुग्णालयात आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार सेवेतील कर्मचारीवर्ग, त्यांच्यावर अवलंबित व्यक्ती तसेच संरक्षण खात्यातील नागरी सेवा कर्मचारी व त्यांच्यावरील अवलंबित व्यक्ती यांचे लसीकरण सुरू आहे. 1 मे 2021 पासून 18 वर्षे व त्यावरील वयाच्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर येथे सर्वसामान्य व्यक्तींना लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देता येण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे.
मुंबई येथील INHS अश्विनी मध्ये गरज भासल्यास त्वरीत सेवेत रुजू होऊ शकतील अशी वैद्यकीय व सामान्य कर्मचारी पथके तयार ठेवण्यात आली आहेत. लष्करी वैद्यकीय सेवा महासंचालकांच्या आदेशावरून देशभरात विविध ठिकाणी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या रुग्णालयातून त्यांना विविध स्वरूपाच्या व परिचारीकीय सेवा देण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.
कोविड परिस्थितीत नागरी प्रशासनाला योग्य ती मदत देण्याबरोबरच तैनात नौदल पथके त्यांच्या संरक्षण आणि सागरी किनारपट्टीचे स्थैर्य राखण्याचे काम तेवढ्याच जबाबदारीने पार पाडत आहे. नुकतेच पश्चिमी नौदल केंद्र पथकांनी फ्रान्स नौदलाबरोबर वरूण-21 या कवायतीत भाग घेतला, मंगलोर येथे शोध आणि सुटका (सर्च अँड रेस्क्यू) कारवाई करत सागरी मार्गाने चाललेले बेकायदेशीर अंमली पदार्थ जप्त केले. अरबी समुद्रातील व्यापारी जहाजांच्या संरक्षणासंदर्भात पथकांची नियमित गस्त सुरू आहे.