India's Economic Growth: IMF कडून भारताच्या GDP वाढीच्या अंदाजात घट; आर्थिक वर्ष 2022 मध्ये 12.5 ऐवजी 9.5 टक्के असेल विकास दर
Representational Image | Economy (Photo Credits: PTI)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मंगळवारी भारताच्या अर्थव्यवस्था वाढीच्या (India's Economic Growth) अंदाजात कपात करण्याची घोषणा केली. आयएमएफने आर्थिक वर्ष 2021-22 मधील जीडीपी वाढीचा (GDP Growth) अंदाज कमी करून 9.5 टक्क्यांवर आणला आहे. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीवर गंभीर परिणाम केला असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. एप्रिलच्या पहिल्या महिन्यात आयएमएफने भारताच्या जीडीपी वाढीचा दर 12.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता, जो पूर्वी 6.9 टक्के होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 8.5 टक्के वाढ अपेक्षित आहे.

अहवालात भारतासारख्या उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थेला कमी लेखले आहे, दुसरीकडे अशा देशांच्या अर्थव्यवस्थेकडे आशेने पाहिले गेले आहे जिथे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. यावर्षी जागतिक अर्थव्यवस्था 6 टक्के दराने वाढेल, असे आयएमएफने म्हटले आहे. 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी घसरली होती. आयएमएफने म्हटले आहे की, जगातील समृद्ध अर्थव्यवस्था विशेषत: अमेरिकेत कोरोना लसीकरणामुळे जोरदार रिकव्हरी पाहिली जाऊ शकते.

आर्थिक वर्ष 2021 मध्ये प्रचंड मंदी आणि कोविडच्या तीव्र दुसर्‍या लाटेमधून भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सावरत आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारताचा जीडीपी 7.3 टक्क्यांनी घसरला आहे. आयएमएफ व्यतिरिक्त इतर अनेक जागतिक व देशांतर्गत एजन्सींनी चालू आर्थिक वर्ष 2021-22 मधील भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे. गेल्या महिन्यात S&P ने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वित्तीय वर्ष 2022 साठी 9.5 टक्के आणि 2022-23 मध्ये 7.8 टक्के राहील असे सांगितले आहे. (हेही वाचा: 7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार एक चांगली बातमी)

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार एप्रिल 2021 ते मार्च 2022 दरम्यान भारताची जीडीपी वाढ 8.3 टक्के असू शकते. अमेरिकन एजन्सी मूडीज यांनीही अंदाज व्यक्त केला आहे की, मार्च 2022 अखेरच्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 9.3 टक्के दराने वाढेल. मूडीजने 2021 या कॅलेंडर वर्षातील वाढीचा अंदाज कमी करून 9.6 टक्क्यांवर आणला आहे.