Coronavirus Update: भारतात मागील 24 तासांत 35,176 रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट 64% हून अधिक
Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित पडणारी मोठी भर सर्वसामान्यांच्या चिंता वाढवत आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 14 लाखांचा टप्पा पार केला असून जगभरातील कोरोना बाधित देशांच्या क्रमवारीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. दरम्यान, भारत सरकारने (Government of India) एक दिलासादायक माहिती दिली आहे. मागील 24 तासांत तब्बल 35,176 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे देशातील कोरोना संसर्गातून रिकव्हर झालेल्यांची संख्या 9,52,743 इतकी झाली आहे. तसंच देशातील कोविड-19 चा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 64% हून अधिक असून मृत्यू दर (Fatality Rate) 2.25% इतका आहे.

देशातील कोरोना व्हायरसची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सह सर्व राज्यांचे सरकार महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहेत. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही स्पष्ट केले आहे. तरी देखील सरकार आणि आरोग्य यंत्रणांकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक आहे.

ANI Tweet:

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 14,83,157 वर पोहचला आहे. तर एकूण 33,425 रुग्णांचा मृत्यूच्या नोंद झाली आहे. दरम्यान 14,83,157 पैकी 4,96,988 सक्रीय रुग्ण (Active Cases) असून 9,52,744 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान ठोस औषध किंवा लस उपलब्ध झाल्याशिवाय कोरोना संसर्गावर मात करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कोरोना विषाणूंवरील लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.