India GDP: कोरोना व्हायरस संकटाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; जूनच्या तिमाहीत जीडीपीमध्ये 23.9 टक्के ऐतिहासिक घट
GDP | (Photo credit: archived, edited, symbolic images)

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics and Programme Implementation) 2020-21 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीतील भारताचे जीडीपीचे (GDP) आकडे जाहीर केले आहेत. कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामुळे एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 23.9 टक्के ऐतिहासिक घट झाली. जुलैमध्ये आठ उद्योगांचे उत्पादन 9.6 टक्क्यांनी घटले आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत स्थिर जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये होती, जी गेल्या वर्षी याच काळात 35.35 लाख कोटी रुपये होती. अशा प्रकारे ती 23.9 टक्क्यांनी घसरली आहे. मागील वर्षी या काळात जीडीपीमध्ये 5.2 टक्के वाढ झाली होती.

या तिमाहीत अर्थव्यवस्था स्थिर आहे, कारण दोन महिन्यांत म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये लॉकडाऊन होते आणि जूनमध्येही याला थोडा वेग आला. या कारणास्तव, जूनच्या तिमाहीत जीडीपी 16 ते 25 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता रेटिंग एजन्सी आणि अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. औद्योगिक उत्पादन, केंद्र व राज्य सरकारच्या खर्चाचे आकडे, शेतीतील उत्पन्न आणि वाहतूक, बँकिंग, विमा इत्यादींच्या कामगिरीची आकडेवारी पाहता ही भीती व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की उत्पादन, बांधकाम, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण इत्यादी क्षेत्रांचा देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 45 टक्के वाटा आहे आणि पहिल्या तिमाहीत या सर्व क्षेत्रांच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. रेटिंग एजन्सी ICRA ने जीडीपीमध्ये 25 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्याचप्रमाणे, इंडिया रेटिंग्जचा जीडीपीमध्ये जवळपास 17 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्रुप इकॉनॉमिक अ‍ॅडव्हायझर सौम्या कांती घोष यांनी जीडीपीमध्ये 16.5 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तविला होता. (हेही वाचा: जानेवारी 2020 पासून इलेक्ट्रॉनिक व्यवहारांवर आकारलेले शुल्क परत करण्याचा बँकांना सल्ला; नाहीतर होईल दंडात्मक कारवाई)

जीडीपीच्या या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील सर्वात मोठी मंदी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, जी चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धातही सुरू राहण्याची अपेक्षा आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे, मागणीवर परिणाम झाला आहे आणि आर्थिक हालचालींचा वेग मंदावला आहे. सामान्यत: सलग दोन तिमाहींचा जीडीपी दर नकारात्मक राहिला तर, त्यास मंदी मानले जाते.