INDIA Meering

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस Indian National Developmental Inclusive Alliance अर्थात INDIA ची बैठक मुंबई मध्ये होणार आहे. मुंबईत होणार्‍या बैठकीमध्ये INDIA चा लोगो जारी केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच 11 सदस्यांच्या कमिटीवर देखील निर्णय होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. INDIA शी साधर्म्य साधतच हा लोगो देखील असेल असेही सांगण्यात आले आहे. कोऑर्डिनेशन कमिटी ही इंडियाच्या कामामध्ये सुसंगती ठेवण्याचं काम करेल असं सांगण्यात आलं आहे. याच बैठकीत coordinator/convenor निवडला जाईल की नाही हे मात्र सांगण्यात आलेलं नाही.

INDIA ची तिसरी बैठक आहे. यापूर्वी पाटणा आणि बेंगलूरू मध्ये बैठक झालेली आहे. मागील बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी 11 जणांच्या पॅनल द्वारा कोऑर्डिनेशन ठेवलं जाईल असं सांगितलं होतं. 'देशपातळीवर एकत्र लढायचं असेल तर प्रादेशिक स्तरावरील वाद आपल्याला मागे ठेवायला हवेत' असेही ते म्हणाले आहेत.

खर्गेंचं विधान बोलायला सोप्प आहे पण त्याची अंमलबजावणी कठीण आहे. आप आणि कॉंग्रेस पक्षातच मोठे वाद आहेत. दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये विविध मुद्द्यांवरून काँग्रेस आणि आपमध्ये कडवट लढाई सुरू असल्याचे दिसते. दिल्लीतील शाळा, दिल्ली सेवा कायदा आणि मोहल्ला दवाखाने यावरून दोन्ही पक्ष भांडत असताना, मुख्य मुद्दा भ्रष्टाचाराचा असल्याचे दिसते. छत्तीसगडला "भ्रष्टाचाराचे केंद्र" बनवल्याबद्दल 'आप'ने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि सीपीएममध्येही काही फारसे चांगले संबंध नाहीत. बंगालमधील पक्षांची युती देखील संभ्रमात आहे कारण टीएमसी सुप्रीमो आणि सीएम ममता बॅनर्जी यांनी त्यांना भारत ब्लॉकमध्ये रहायचे असल्यास युती तोडण्यास सांगितले आहे. या मुद्द्यांवर विरोधकांची मुंबई बैठक महत्त्वाची ठरणार आहे.