India Bans 111 Spice Makers: एप्रिलमध्ये, सिंगापूर आणि हाँगकाँगने भारतातील लोकप्रिय मसाला ब्रँड एमडीएच प्रायव्हेट लिमिटेड (MDH Pvt Ltd) आणि एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (Everest Food Products Pvt Ltd) च्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली होती. आरोप केला गेला होता की, या कंपनींच्या मसाले उत्पादनामध्ये कर्करोगाला कारणीभूत असणारे कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड सापडले आहे. यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने देशभरातील विविध शहरांमध्ये मसाल्यांचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांची सुरक्षितता तपासता येईल.
अलीकडील अहवालानुसार, गेल्या एका महिन्यात एफएसएसएआयने 111 मसाले उत्पादकांचे उत्पादन परवाने रद्द केले आहेत आणि त्यांना त्वरित उत्पादन थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही प्रक्रिया अजूनही चालू आहे आणि एफएसएसएआयद्वारे देशभरात 4,000 नमुने तपासले जात आहेत, ज्यामुळे आणखी परवाने रद्द होण्याची शक्यता आहे.
मिंटमधील अहवालानुसार, एफएसएसएआयने 2,200 नमुन्यांची चाचणी केली आहे. त्यापैकी 111 मसाला उत्पादकांची उत्पादने मूलभूत मानक गुणवत्ता पूर्ण करत नसल्याचे दिसून आले आहे. अशा मसाला उत्पादकांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात आले असून, उत्पादन बंद करण्यात आले आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, एफएसएसएआय अंतर्गत चाचणी केंद्रांची संख्या कमी आहे, त्यामुळे ज्या कंपन्यांचे परवाने रद्द करायचे आहेत त्यांची यादी तयार करण्यास वेळ लागत आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रद्द करण्यात आलेले बहुतांश परवाने हे केरळ आणि तामिळनाडूमधील लहान मसाले उत्पादकांचे आहेत, तर गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील कंपन्यांचीही चौकशी सुरू आहे. या 111 कंपन्या लहान प्रमाणात काम करतात आणि त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत वेबसाइट, संपर्क क्रमांक किंवा ईमेल आयडी नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
याच प्रक्रियेत, मे महिन्यात, एफएसएसएआयने एमडीएच आणि एव्हरेस्टच्या नमुन्यांची चाचणी केली, मात्र त्यात इथिलीन ऑक्साईड आढळले नाही. चाचणीमध्ये एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांचे 34 नमुने समाविष्ट होते. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साईडला ग्रुप 1 कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले आहे, ज्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याच्या जोखमीसह गंभीर आरोग्य धोके निर्माण होतात.