खराब झालेल्या Antigen Test Kit ने केल्या 10 हजार लोकांच्या चाचण्या; निगेटिव्ह रिपोर्ट देऊन पाठवले, UP मधील धक्कादायक प्रकार
Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या महामारीदरम्यान बरेलीमध्ये (Bareilly) आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बरेलीच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय महामंडळाकडून मिळालेली अँटीजेन टेस्ट किट खराब असूनही त्याने सुमारे 10 हजार लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. इतकेच नाही तर या हेतुपुरस्सर केलेल्या चुकीमुळे गोंधळ निर्माण होईल या भीतीने, बहुतेक लोकांना त्यांचा कोरोना अहवाल नकारात्मक असल्याचे सांगून परत पाठवण्यात आले. या लोकांचे आरटीपीसीआर तपासणीसाठीही नमुने घेण्यात आले आहेत, मात्र त्याचा अहवाल येईपर्यंत आणखी किती संक्रमित लोक हा संसर्ग पसरवतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

मेडिकल कॉर्पोरेशनने काही दिवसांपूर्वी बरेलीच्या आरोग्य विभागाला सुमारे दहा हजार अँटीजेन किट्स पाठवल्या होत्या. या किट्स मुख्यालयातून समुदाय आरोग्य केंद्रांसह वैद्यकीय मोबाइल युनिट्सकडे पाठविण्यात आल्या. परंतु जेव्हा त्या वापरण्यात आल्या तेव्हा बराच काळ उलटूनही व्हायरल लोड दाखवत नव्हत्या. तेव्हा लक्षात आले की या किट्स तारीख उलटून गेलेल्या म्हणजेच 'आऊट ऑफ डेट' अँटीजेन टेस्ट किट आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएमओला याची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी संशयित संक्रमित लोकांचे आरटीपीसीआर नमुनेही घेण्याच्या सूचना केल्या. मात्र या निरुपयोगी अँटीजेन किटद्वारे चाचण्या करायच्या आहेत की नाहीत याबाबत स्पष्ट काही सांगितले नाही. यादरम्यान अँटीजेन किटने केलेल्या चाचण्यांमध्ये कोणतेच निकाल दिसत नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल म्हणून लोकांना त्यांचे अहवाल नकारात्मक आहेत असे सांगण्यात येऊ लागले. अशा प्रकारे अवघ्या तीन दिवसांत सर्व अँटीजेन किट संपवून टाकल्या.

अशाप्रकारे ज्या लोकांना नकारात्मक अहवाल दिले आहेत त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना सकारात्मक लोक असण्याची शक्यता आहे. आता त्यांचा आरटीपीसीआर अहवाल येईपर्यंत ते इतरही अनेकांना संक्रमित करू शकतात. आरटीपीसीआर चाचणीचा निकाल येण्यासाठी वेळ लागत असल्याने चिंता अजून वाढली आहे. सदोष अँटिजन किटमुळे हजारो लोकांचा अहवाल निगेटिव्ह दाखवल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट आल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे 18 ते 20 टक्के कोरोनाबाधित घटल्याचे सांगितले जात आहे.