राजस्थानमध्ये एक लाजीरवाणे प्रकरण समोर आले आहे. नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर त्याच रात्री या महिलेवर सासरा आणि इतर नातेवाईकांनी सामुहिक बलात्कार केला. 22 नोव्हेंबर रोजी राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील एका खेड्यात ही घटना घडली. घटनेच्या दुसर्याच दिवशी पिडीतेने भिवडी महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, परंतु अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार पिडीतेचे वय 25 वर्षे आहे. 2015 साली तिचे लग्न झाले होते आणि त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. तेव्हापासून तिचा नवरा आणि सासरच्या लोकांनी तिचा हुंड्यासाठी छळ करायला सुरुवात केली.
लग्नात तिच्या वडिलांनी आपल्या क्षमतेनुसार हुंडा दिला होता. परंतु तरीही तिचा पती, मेहुणे, सासरे यांनी तिच्याकडून अधिक हुंड्याची मागणी करत तीला त्रास द्यायला सुरुवात केली. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला. त्याच रात्री 11-12 च्या सुमारास तिचा सासरा जबरदस्तीने खोलीत घुसला. आपल्या मुलाने तुला घटस्फोट दिला आहे, त्यामुळे तू माझी सून नाहीस असे म्हणत तिला शस्त्राचा धाक दाखवला. त्यानंतर त्याने व इतर नातेवाईकांनी मिळून या महिलेवर सामुहिक बलात्कार केला. तसेच बलात्कारानंतर धमकी दिली की तिने हे कुणाला सांगितले तर ती जिवंत राहणार नाही. दुसर्या दिवशी सकाळी पीडितेने तिच्या वडिलांना या घटनेबद्दल सांगितले.
(हेही वाचा: पहिल्या पतीने आपल्या साथीदारांसह महिलेवर केला सामूहिक बलात्कार; गुप्तांगावर दिले सिगारेटचे चटके)
पीडित मुलीने तिच्या वडिलांच्या मदतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडितेचे वडील तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या सासरी गेले असता, सासरच्या लोकांकडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. नंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली. पोलिसांनी सांगितले की धारा 498ए, 323, 376डी सहित 3,4 मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) अधिनियम - 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास भिवडी सीओ हरिराम कुमावत करीत आहेत.