मुंबईमधील (Mumbai) गर्दी, सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी ट्रेन-मेट्रो पकडण्यासाठी होणारी धावपळ ही बाब जगजाहीर आहे. आता याच गर्दीसंदर्भात एक हटके प्रकरण समोर आले आहे. एस्प्लानेड मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गेल्या आठवड्यात एका 40 वर्षीय पुरुषाला एका महिलेचा पाठलाग केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. मुंबईच्या रस्त्यावर गर्दीच्या वेळी एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करणे ‘अत्यंत अशक्य’ आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले.
मुंबईच्या कालबादेवी परिसरातील चिरा बाजार येथे गॅरेज असलेल्या व्यक्तीवर, एका महिलेचा बाईकवरून रोज सकाळी ती मरीन लाइन्स स्टेशनला जात असताना पाठलाग केल्याचा आरोप होता. चिरा बाजार येथील रहिवासी असलेली ही महिला लोअर परळ येथे काम करते. तिचा स्टेशनला जाणारा रोड हा या पुरुषाच्या गॅरेजवरून जातो. महिलेचा आरोप आहे की, आरोपी तिच्याकडे टक लावून पाहत असे. तसेच कामावर जाताना जेव्हा ती या व्यक्तीचे गॅरेज ओलांडायची तेव्हा तो त्याच्या बाईकवरून तिचा पाठलाग करायचा.
3 ऑगस्ट 2017 रोजी जेव्हा ती स्टेशनवर पोहोचली, तेव्हा या व्यक्तीने तिला हात लावून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने तिच्या दोन पुरुष मित्रांशी बोलून त्यांच्या सूचनेनुसार या व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारे, एलटी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि या व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 354D अंतर्गत पाठलाग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. परंतु या व्यक्तीने हे सर्व आरोप नाकारले आणि दावा केला की हे गैरसमजाचे प्रकरण आहे.
आता मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यशश्री मारुलकर यांनी नोंदवले की, मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवरील गर्दीत, विशेषत: सकाळच्या वेळी जेव्हा लोक रेल्वे स्थानक आणि कार्यालय गाठण्यासाठी धावपळ करत असतात तेव्हा एखाद्याचा पाठलाग करणे अशक्य आहे. मुळात, सकाळच्या व्यस्त वेळेत फूटपाथवरून चालत असलेल्या एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करणे शक्य नाही, त्यात दुचाकीवरून तर ते अजिबात शक्य नाही. या व्यक्तीच्या दाव्याशी सहमती दर्शवत न्यायालयाने म्हटले की, कदाचित गैरसमजामधून ही गोष्ट घडली असावी. (हेही वाचा: Crime: चॉकलेटचे अमिष दाखवत सेवानिवृत्त इन्स्पेक्टरचे 10 वर्षांच्या मुलीसोबत घाणेरडे कृत्य)
यावेळी महानगर दंडाधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवण्यास झालेल्या विलंबावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, जर आरोपी तीन महिने नियमितपणे महिलेचा पाठलाग करत असेल तर तिने ताबडतोब पोलिसांकडे तक्रार का दाखल केली नाही.