V. Vaidyanathan (संग्रहित संपादित प्रतिमा)

खाजगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेचे (IDFC FIRST Bank) एमडी आणि सीईओ व्ही वैद्यनाथन (V. Vaidyanathan) यांनी उदारतेचे एक मोठे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे, जो चर्चेचा विषय बनला आहे. व्ही वैद्यनाथन यांनी त्यांचा ड्रायव्हर, हाऊस हेल्प, ट्रेनर आणि इतर दोघांना करोडो रुपयांचे शेअर्स गिफ्ट केले आहेत. एका अहवालानुसार, वैद्यनाथन यांनी या लोकांना घरे खरेदी करण्यात मदत करण्यासाठी 3.95 कोटी रुपयांचे नऊ लाख शेअर्स दिले आहेत. नियामक फाइलिंगमध्ये, बँकेने म्हटले आहे की वैद्यनाथन यांनी 21 फेब्रुवारी रोजी त्यांचे नऊ लाख इक्विटी शेअर्स त्यांच्या या जवळच्या लोकांना गिफ्ट केले आहेत.

या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बँकेच्या सीईओने त्यांचे ट्रेनर रमेश राजू यांना 3 लाख शेअर्स भेट दिले. याशिवाय, घरातील मदतनीस प्रांजल नार्वेकर आणि ड्रायव्हर एल्गारसामी सी मुनापर यांना 2-2 लाख शेअर्स गिफ्ट केले आहेत. ऑफिसचे सहाय्यक कर्मचारी दीपक पटारे आणि अजून एक हाऊस हेल्प संतोष जोगळे यांना प्रत्येकी 1 लाख शेअर्स भेट देण्यात आले आहेत. अहवालानुसार, बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे की, रुक्मणी सोशल वेलफेअर ट्रस्टने सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी 2 लाख इक्विटी शेअर्स दिले आहेत.

अशा प्रकारे बँकेचे एकूण 11 लाख इक्विटी शेअर्स भेट देण्यात आले आहेत. सीईओ व्ही वैद्यनाथन यांना या व्यवहारांमधून कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ झालेला नाही. BSE वर सोमवारच्या बंद भावानुसार याच्या एका शेअरची किंमत 43.90 रुपये आहे. त्यानुसार वैद्यनाथन यांनी त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना 3,95,10,00 रुपये किमतीचे 9 लाख शेअर्स भेट म्हणून दिले आहेत. या पाच जणांचा IDFC FIRST बँकेशी काहीही संबंध नाही. (हेही वाचा: Stock Markets: शेअर बाजाराला यूक्रेन-रशिया वादाचा फटका, BSE Sensex 1,000 अंकांनी घसरला)

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कडे व्ही वैद्यनाथन यांचे 31 डिसेंबर 2021 पर्यंत IDFC फर्स्ट बँकेचे 2.44 कोटी शेअर्स उपलब्ध आहेत. याआधीही 2021 मध्ये त्यांनी 2.43 कोटी किमतीचे 4.5 लाख शेअर्स त्यांच्या कर्मचाऱ्यांना घर खरेदी करण्यासाठी दिले होते.