Hyderabad: घरगुती वादामुळे महिलेचे निर्दयी कृत्य; आईच्या मदतीने वृद्ध सासूला केली मारहाण, घटना CCTV मध्ये कैद
महिलेची आईच्या मदतीने सासूला मारहाण (Photo Credits ANI)

घरगुती वादावरून (Family Dispute) एका वृद्ध महिलेला तिची सून आणि सुनेच्या आईने निर्दयीपणे मारहाण केली आहे. हैदराबाद (Hyderabad) च्या मल्लेपल्ली भागात ही घटना घडली, जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आता हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्मा बेगमने तिची 55 वर्षीय सासू तस्नीम सुल्तानाला तिच्या केसांना धरुन जमिनीवर फरपटले आणि अनेकवेळा मारहाण केली. सुल्तानावर प्रथम उज्मा बेगमची आई असिफा बेगमने हल्ला केला, त्यानंतर उज्माने तिच्या सासूला मारहाण केली.

ही घटना गुरुवारी हुमायूं नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली व सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी उज्मा आणि तिच्या आईला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक कोरानी सुनील यांच्या म्हणण्यानुसार, उज्माच्या सासरच्या लोकांनी tइच्या फ्लॅटची वीज आणि पाणीपुरवठा बंद केल्यावर ही घटना घडली. दोघेही एकाच इमारतीत राहतात. याच कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला. उज्माची आईसुद्धा या वादात पडली आणि दोघींनी सुलतानाला मारहाण करण्यास सुरवात केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोघीही या वृद्ध महिलेच्या अंगावर बसून तिला मारहाण करीत आहेत.

एएनआय ट्वीट -

उज्मा आणि तिच्या सासूने यापूर्वी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघींना समजही दिली होती. तपासात असे समोर आले आहे की, सौदी अरेबियात राहणारा सुलतानाचा मुलगा उबैद अली खानने गेल्या वर्षी उज्माशी लग्न केले होते. हे दोघांचे दुसरे लग्न होते. उज्माने तिच्या सासूवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. तिने पोलिसांना सांगितले की तिचे सासरचे लोक तिला सौदीमध्ये आपल्या पतीला भेटू देत नाहीत किंवा नियमितपणे फोनवर बोलू देत नाहीत. (हेही वाचा: हैद्राबाद येथील पबमध्ये कोरोना विषाणू मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली; मास्क नाही, सामाजिक अंतर नाही, पार्टीमध्ये मश्गुल बेभान तरुणाई (Watch Video)

या दोघींमध्ये वारंवार भांडण होत होते, परंतु गुरुवारी उज्माच्या फ्लॅटची वीज व पाण्याचा पुरवठा थांबविण्यात आला असता ही मारहाणीची घटना घडली. पोलिस अधिकारी म्हणाले, ‘आम्ही उज्मा आणि तिच्या आईविरूद्ध कलम 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे.’