Hyderabad: 27 वर्षीय महिला केअरटेकरचे अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; न्यायालयाने सुनावली 20 वर्षांची शिक्षा
Photo Credit: File Image

हैदराबादमध्ये (Hyderabad) एक 27 वर्षीय युवती अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. या युवतीने शाळेत या लहान मुलाचे लैंगिक शोषण केले होते. या प्रकरणात बलात्काराच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने आणि पॉक्सो कायद्याने युवतीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच तिला 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ज्या शाळेत हा मुलगा शिकत होता तिथे ही युवती केअरटेकर म्हणून काम करायची.

या प्रकरणात, चंद्रयानगुट्टा पोलिसांनी मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून डिसेंबर 2017 मध्ये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी POCSO कायद्यासह महिलेवर IPC चे इतर काही गंभीर कलम लावले होते. मुलाच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना मुलाच्या शरीरावर चटके दिल्याच्या खुणा आढळल्या. त्यानंतर त्यांनी मुलाकडे याबाबत विचारपूस केली असता, मुलाने सांगितले की शाळेच्या नवीन केअरटेकरचे हे कृत्य आहे. ती आपल्याला अयोग्य ठिकाणी स्पर्श करते. ही केअरटेकर नवी असून ती आपल्याशी नेहमी वाईट वागते असेही मुलाने सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, मुलाला तिने धमकावले होते की घडत असलेल्या गोष्टी कोणालाही सांगू नको. तिने अनेकदा मुलाला सिगारेटचे चटके दिले होते. तिने बऱ्याच काळासाठी मुलाला धमकावणे व त्याचे लैंगिक शोषण करणे सुरु ठेवले. आता पोलिसांच्या तपास अहवालानंतर न्यायालयाने या प्रकरणात महिलेला दोषी ठरवले आणि तिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. (हेही वाचा: NCRB Report 2021: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार मेट्रो सिटीमधील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 21.1 टक्के घट)

दरम्यान, हैदराबाद जिल्ह्यातील सैदाबादमधील 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येचे प्रकरण चर्चेत होते. गुरुवारी हैदराबाद पोलिसांना रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह सापडला. हा मृतदेह या प्रकरणातील आरोपींचा आहे, तेलंगणाच्या डीजीपीने याची पुष्टी केली आहे. वारंगलमधील रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह सापडला होत. मृतदेहाची तपासणी केली असता हातावरील टॅटूच्या आधारे तो सैदाबाद बलात्कार-हत्या घटनेतील आरोपी असल्याचे आढळले.