आजच्या काळातही जागोजागी न्यायालये, समाधान केंद्रे उपलब्ध असूनही पती पत्नीमधील वादाबाबत पंचायत निर्णय घेत आहेत. पंचायतीने निर्णय दिलेले असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गोरखपूरमधील (Gorakhpur) पिपराईच येथे पंचायतीने 71 मेंढ्यांच्या बदल्यात एका महिलेचा व्यवहार तिच्या प्रियकरासोबत केला आहे. मात्र जेव्हा पंचायतीने महिलेच्या पतीला 71 मेंढरे देण्याचे फर्मान दिले, तेव्हा प्रियकराच्या वडिलांनी येऊन त्यांच्या 71 मेंढ्या परत मागितल्या. त्यानंतर आता पंचायतीच्या समोर नक्की काय करावे हा प्रश्न पडला आहे.
गोरखपूरच्या खोराबार भागात ही विचित्र घटना घडली आहे. पंचायतीने 71 मेंढ्यांच्या बदल्यात एका महिलेला तिच्या प्रियकराला सोपवले. आता पंचायतीच्या या निर्णयाला प्रियकराच्या वडिलांनी नकार दिला आहे. त्यांनी खोराबार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत आपल्या 71 मेंढ्या परत मिळवण्याची मागणी केली आहे. या नंतर पंचायतीचे सदस्य गायब आहेत. पहिल्या नवऱ्याशी घटस्फोट होण्याआधी त्यांनी या युवतीला एका दुसऱ्या युवकासोबत राहण्याची परवानगी दिली आहे.
22 जुलै रोजी एक तरुण आपल्याच गावातील एका व्यक्तीच्या पत्नीला घेऊन पळून गेला. यानंतर ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली तेव्हा महिलेने आपण प्रियकरासोबत राहणार असल्याचे सांगितले व ती त्याच्यासोबत निघून गेली. पुढे या पत्नीचा पती आणि प्रियकर यांमध्ये भांडण झाले. शेवटी पंचायतीने प्रियकराकडे असलेल्या 142 मेंढ्यांपैकी 71 मेंढ्या या महिलेच्या पतीला देण्यास सांगितले व या महिलेला प्रीयाकासोबत जाण्याची परवानगी दिली.