जातीय सलोखा जपत कर्नाटकमध्ये एका मुस्लिम कुटुंबाने 90 वर्षांच्या एका वृद्ध हिंदू महिलेच्या अंतिम संस्काराची काळजी घेतल्याची घटना समोर आली आहे. उडुपी जिल्ह्यातील कौप जवळील मल्लार गावातील ही घटना आहे. एका मुस्लिम कुटुंबाने जानकी पूजारीचे अंतिम संस्कार हिंदू रीतिरिवाजानुसार करण्यासाठी पुढाकार घेतला आणि तिच्या मुलाला मुंबईहून आणले. पतीच्या निधनानंतर जानकी मुंबईत रफीकच्या आईसोबत कुटुंबातील सदस्य म्हणून राहत होती.
अनेक वर्षे जानकी तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हती आणि तिचा एकुलता एक मुलगा शेखर विठ्ठल वेगळा राहत होता. 1980 मध्ये रफीक आणि त्याचे कुटुंब मुंबईहून उडपीला आले आणि जानकीही त्यांच्यासोबत आली. मंगळवारी जानकीने अखेरचा श्वास घेतला आणि रफीकच्या कुटुंबीयांनी बुधवारी कौप येथील रुद्र भूमीत तिचा अंत्यसंस्कार करण्याची सर्व व्यवस्था केली. (हेही वाचा: Divorce for Making Fun of Religion: पत्नी उडवायची पतीच्या हिंदू धर्माची खिल्ली; उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट, म्हटले- 'ही मानसिक क्रूरता').
"माझ्या लहानपणापासूनच जानकी कुटुंबातील सदस्य म्हणून आमच्यासोबत होती. खरं तर तिचा मुलगा एक आठवड्यापूर्वी त्याच्या आईला भेटायला आला होता, जेव्हा तिची प्रकृती चिंताजनक होती. जानकीच्या मृत्यूनंतर मी त्याला कळवले आणि त्याला येण्यास सांगितले. हिंदू परंपरेनुसार त्याच्या आईचे अंतिम संस्कार करा,” अशी प्रतिक्रिया रफीक ने दिली आहे.