Highest Average Salary; महाराष्ट्रातील 'या' शहरात मिळतो देशातील सर्वाधिक सरासरी पगार; मुंबई, बेंगळुरू, दिल्लीला टाकले मागे
Money प्रतिकात्मक फोटो (Photo Credits PTI)

फक्त महानगरांमध्येच लोकांना जास्त पगार मिळतो, असा अनेकांचा समज आहे. परंतु, सरासरी वेतन सर्वेक्षणाचे (Highest Average Salary) आकडे वेगळेच काही सांगत आहेत. भारतातील वार्षिक सरासरी पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील सोलापूरने बाजी मारली आहे. सोलापूरने मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूसारख्या महानगरांना मागे टाकल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. सोलापूर हे भारतातील सरासरी दरवर्षी सर्वाधिक पगार देणारे शहर बनले आहे.

वेतन सर्वेक्षणाचा निकाल जगातील 138 देशांतील हजारो कामगारांच्या डेटावर आधारित आहे. भारतातील 11,570 कर्मचाऱ्यांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. भारतातील महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सोलापुरातील वार्षिक सरासरी पगार 28,10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. याबाबत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील वार्षिक सरासरी पगार 21.17 लाख रुपये होता. बंगळुरू 21.01 लाख रुपये सरासरी पगारासह तिसऱ्या स्थानावर आहे आणि वार्षिक सरासरी 20.43 लाख पगारासह नवी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. महत्वाचे म्हणजे सोलापूरची गणना टियर-2 शहरांमध्ये होत असूनही, सोलापूर पगाराच्या बाबतीत अव्वल ठरले आहे.

महिला-पुरुषांच्या पगारात मोठी तफावत असून महिलांना कमी पैसे मिळतात, असेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. पुरुषांना भारतात सरासरी 19,53,055 रुपये पगार मिळतो, तर महिलांचा सरासरी पगार 15,16,296 रुपये आहे. भारतात सर्वाधिक पगार व्यवस्थापन आणि व्यावसायिक उद्योगांमध्ये आहे. येथे वार्षिक सरासरी पगार 29.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. कायद्याचा व्यवसाय या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून या क्षेत्रातील सरासरी वार्षिक पगार 27 लाख रुपये इतका आहे. (हेही वाचा; PMLA Act: आता जीएसटीशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडी थेट हस्तक्षेप करू शकणार, चुकीचे काम करणाऱ्यांवर होणार कारवाई)

साधारण 20 वर्षे किंवा त्याहून अधिक नोकरीचा अनुभव असलेल्या लोकांचा सरासरी वार्षिक पगार 38,15,462 रुपये आहे, तर 16 ते 20 वर्षांचा अनुभव असलेल्यांना वार्षिक 36 लाख 50 हजार मिळतात. डॉक्टरेट पदवी असलेल्या लोकांचा सरासरी पगार 27 लाख 52 हजारांपेक्षा जास्त आहे, तर हायस्कूल पदवीपेक्षा कमी असलेल्या लोकांचा सरासरी पगार 11 लाख 12 हजारांपेक्षा जास्त आहे.

राज्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे. याआधी 2022 मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये सरासरी मासिक पगार 20,730 रुपये होता. हे देशातील सर्वाधिक आहे. पश्चिम बंगाल 20,210 सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाची आर्थिक राजधानी तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे सरासरी मासिक वेतन 20,110 रुपये आहे. चौथ्या क्रमांकावर बिहार आहे. येथे सरासरी मासिक पगार 19,960 आहे. 19740 रुपये मासिक वेतनासह राजस्थान आणि मध्य प्रदेश संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.