Cyclone Dana: ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) ला धडकलेल्या ‘दाना’ चक्रीवादळामुळे (Cyclone Dana) राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आधीच केलेल्या बंदोबस्तामुळे मोठे नुकसान टाळण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, शुक्रवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब वरून खराब श्रेणीत किरकोळ सुधारली.
केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज -
दक्षिणेकडील किनारपट्टीवरील अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे IMD ने केरळमधील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यांमध्ये 27 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाचा राज्याच्या इतर भागांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Cyclone Dana: दाना चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रभावीत; आयएमडीकडून मुसळधार पावसाचा इशारा)
भारतीय हवामान विभागाने, बाधित भागात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. रहिवाशांना हवामानविषयक इशाऱ्यांसंदर्भात अपडेट राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्व भारतात, दाना चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पूर्व मिदनापूर आणि दक्षिण 24 परगणा सारख्या भागात सुरुवातीला लक्षणीय परिणामाचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही.
दरम्यान, कोलकाता आणि दक्षिण बंगालच्या इतर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी रात्री उशिरापासून सतत पाऊस पडत आहे. अंदाजानुसार संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस पडेल आणि त्यानंतर पाऊस कमी होईल. झारखंडमध्ये दाना चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पश्चिम सिंगभूम, सरायकेला-खरसावन आणि कोल्हानच्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. तथापी, हवामान विभागाने झारखंडमधील कोल्हान क्षेत्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. परिणामी या जिल्ह्यांतील शाळा 25 ऑक्टोबर रोजी सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्य मुसळधार पाऊस -
दाना चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. दाना चक्रीवादळामुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. तथापि, चक्रीवादळाचा उड्डाण आणि रेल्वे सेवांवरही परिणाम झाला. मात्र, काही वेळानंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या.