Heatstroke | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

ओडिशा राज्या उष्णतेची लाट (Heat Wave in Odisha) निर्माण झाली असून उष्माघात (Heatstroke) झाल्याने दगावणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही वाढले आहे. ताज्या माहितीनुसार या उन्हाळ्यात राज्यातील उष्माघाताने मृत्यू (Deaths Due To Heat Stroke) झालेल्यांची संख्या 141 वर पोहोचली आहे. स्पेशल रिलीफ कमिशनरने (SRC) दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, पाठिमागील 24 तासांत सरकारने 45 नवीन मृत्यूची नोंद केली आहे. शनिवारपर्यंत (1 जून) मृतांची संख्या 96 इतकी होती. उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सूचना आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यातील तापमान अद्यापही चढेच असल्याने चिंता वाढली आहे.

सुंदरगड जिल्हा सर्वाधिक उष्माघात प्रभावित

स्पेशल रिलीफ कमिशनरने (SRC) जारी केलेल्या निवेदनानुसार, शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) अहवालानंतर एकूण मृत्यूंपैकी 26 मृत्यू उष्माघाताने झाल्याची पुष्टी झाली आहे. उर्वरित 107 प्रकरणांची चौकशी राज्य सरकार करत आहे. याव्यतिरिक्त, सरकारने आठ मृत्यूंना उष्माघात व्यतिरिक्त इतर कारणे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. उष्णतेची लाट उद्भवल्याने  गेल्या तीन दिवसांत, 99 मृत्यूची नोंद झाली आहे. प्रामुख्याने राज्याच्या पश्चिम भागातून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. सुंदरगड जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. या जिल्ह्यात तीन दिवसांत उष्माघाताने 35 संशयित मृत्यू झाले आहेत. सुंदरगडचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आशुतोष कुलकर्णी यांनी सांगितले की, "मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात आहे. उष्माघातामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे." (हेही वाचा, Beat The Heat: उन्हाळ्यात रोगांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा, उन्हाळ्याच्या पीक अवर्समध्ये स्वयंपाक करणे टाळा)

बालंगीर जिल्ह्यात उष्माघाताचे 20 संशयित, चौघांच्या मृत्यूची पुष्टी

बालंगीर जिल्ह्यात, 20 संशयितांची उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. चार मृत्यू उष्णतेशी संबंधित आजार म्हणून पुष्टी झाले आहेत. उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. संबलपूर जिल्ह्यात 18 संशयित प्रकरणे नोंदली गेली आहेत. संबलपूरचे जिल्हाधिकारी अक्षय सुनील अग्रवाल म्हणाले, "उष्माघातामुळे सात संशयित मृत्यूंचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पाच जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. उर्वरित 11 प्रकरणांचे अहवाल प्रलंबित आहेत." उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे अवाहन संबलपूरचे जिल्हाधिकारी अक्षय सुनील अग्रवाल यांनी केले आहे. (हेही वाचा, Heat Wave In India: उष्णतेने मोडले सर्व विक्रम, राजस्थान आणि हरियाणामध्ये तापमान ५० च्या पुढे, दिल्लीतही तीच स्थिती)

एक्स पोस्ट

पंतप्रधानांकडून परिस्थितीचा आढावा

दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट निर्माण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी (2 जून) एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत त्यांनी ओडिशा राज्यासह देशभरात निर्माण झालेली उष्णतेची लाट आणि उष्माघाताने झालेले मृत्यू याबाबत परिस्थितीचा आढावा घेतला.