हाथरस गॅंगरेप (Hathras Gangrape) प्रकरणानंतर पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 19 वर्षीय मुलीवर 4 जणांनी बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या प्रयत्नात जबर जखमी झालेल्या मुलीचा काल उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला आहे. दरम्यान आज (30 सप्टेंबर) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सामुहिक बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी 3 सदस्यीय SIT समिती नेमली आहे. तसेच त्यांना 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस गॅंगरेप प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची देखील माहिती दिली आहे. सोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषींना कडक शासन देण्याचे आदेश दिले आहे. ट्वीटरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात सामुहिक बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी 3 सदस्यीय SIT समितीमध्ये अध्यक्ष सचिव गृह भगवान स्वरूप, चंद्रप्रकाश, पुलिस उपमहानिरीक्षक व श्रीमती पूनम, सेनानायक पीएसी आगरा यांचा समावेश असेल.
उत्तर प्रदेश सरकारचं Tweet
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी ने हाथरस की घटना के लिए दोषी व्यक्तियों के खिलाफ फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाने और प्रभावी पैरवी करने के स्पष्ट निर्देश दिए हैं।
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) September 30, 2020
उत्तर प्रदेशातील हाथरस गॅंगरेप प्रकरणानंतर देशभरातून राजकीय, बॉलिवूड जगतातील सेलिब्रिटींसोबतच सामान्यांनीदेखील आपला रोष व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान पीडीतेवर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळेस तिच्या कुटुंबियांना घरातच कोंडून ठेवण्यात आल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत. सध्या यावरून देखील राजकारण तापले आहे. अनेक राजकीय मंडळींनी सरकारी यंत्रणेवर यावरून ताशेरे ओढले आहेत. Hathras Gangrape: हाथरस सामूहिक बलात्कार घटनेबाबत अभिनेता अक्षय कुमार ने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली नाराजी, म्हणाला दोषींना फाशी द्या.
बलात्कार पीडीत मुलगी 19 वर्षीय दलित असून तिच्यावर बलात्कार व अमानुष अत्याचार करणारे 4 जण सवर्ण जातीतील असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.