Haryana: माता न तू वैरिणी! आईने 4 मुलींची गळा चिरून केली हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न; चौकशी सुरु
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

स्त्री-पुरुष समानता, स्त्री भृणहत्येचा विरोध याबाबत सरकार इतकी जनजागृती करत असूनही, समाजामध्ये मुलींपेक्षा मुलांना प्राधान्य देणाऱ्या लोकांची संख्या जास्त दिसून येते. याचबाबत हरियाणाच्या (Haryana) मेवात (Mewat) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथल्या पिपरौली गावातल्या एका महिलेवर आपल्या चार मुलींची हत्या केल्याचा आरोप आहे. मुलींची हत्या केल्यानंतर या महिलेने स्वतः आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आपला गळाही चिरला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या 4 मुलींमध्ये 8 महिन्याच्या लहान बाळाचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फरमिना (35) आपला नवरा खुर्शीद अहमदसह राहत होती. 2012 मध्ये या दोघांचा विवाह झाला होता. खुर्शीद आणि फरमिनाला मुस्कान-7, मिसकिना-5, अलसिफा-3 आणि आठ महिन्यांची एक मुलगी होती. शुक्रवारी काही गावकरी गावातील तीन सदस्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी एकत्र जमले होते. काही वेळानंतर लोक आपापल्या घरी गेले. पहाटे तीनच्या सुमारास खुर्शीदही घरी परतला. मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याला आढळले. दरवाजा वारंवार ठोठावला तरी तो उघडला गेला नाही. त्यानंतर त्याने खिडकीमधून पहिले असता, त्याची पत्नी स्वतःचा गळा चिरत असलेली त्याला आढळली.

त्यानंतर त्याने ताबडतोब शेजाऱ्यांना बोलावले व त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. जेव्हा खुर्शीद घरात आला तेव्हा मुली रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडलेल्या आढळल्या. त्याने लगेच फरमिनाच्या हातातील चाकू काढून घेतला व तिला रुग्णालयात हलवले. सध्या फरमिनाची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर नुह शहीद हसन खान वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पुन्हाना पोलिस स्टेशनचे एसएचओ संतोष कुमार यांनी फरमिनाचे कुटुंबीय व त्यांचे शेजारी यांच्याकडून माहिती घेतली असून, प्रकरणाचा तपास सुरु आहे. (हेही वाचा: मध्य प्रदेश: चेटकीण समजून मुलाने केली 65 वर्षीय आईची हत्या; आरोपीला अटक)

याबाबत, एसपी (नूह) नरेंदर बिरजानिया म्हणाले, ‘मुलींची हत्या नेकामी कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. आम्ही महिलेने आपले निवेदन नोंदविण्याची वाट पाहत आहोत. तिची प्रकृती सध्या नाजूक आहे.’