हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सेल्फी घेणाऱ्या युवकाला धक्का देत राग केला व्यक्त (Watch Video)
Haryana CM Manohar Lal Khattar pushes aside a man who tries to take a selfie with him (Photo Credits: ANI)

हरियाणाचे (Haryana) मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांचा रागीट अंदाज पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या युवकाला त्यांनी चक्क धक्का देवून बाजूला सारले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर करनाल हे भाजप द्वारा आयोजित कार्यकर्ता अभिनंदन समारोह समारंभात उपस्थित होते. त्यादरम्यान एका युवकाने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा केलेला प्रयत्न त्यांनी हाणून पाडला.

एएनआयने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कार्यक्रमात लोकांचे अभिवादन स्वीकारत खट्टर चालत असताना अचानक एक युवक येऊन त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करु लागतो. मात्र त्याचवेळेस खट्टर चिडतात आणि त्या युवकाला धक्का देत बाजूला सारतात.

पहा व्हिडिओ:

खट्टर यांचा हा रागीट अंदाज पाहण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही एका कार्यक्रमात ते मीडियातून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चांगलेच भडकले होते. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यावरुन नाराज झालेल्या खट्टर यांनी सोशल मीडियावरील एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते.

फेब्रुवारी महिन्यात एक दांपत्य खट्टर यांच्याकडे 19 लाखांची अफरातफर झाल्याची तक्रार घेऊन आले होते. तेव्हा देखील त्या वृद्ध दांपत्यावर खट्टर चांगलेच भडकले होते. काँग्रेस पक्ष देखील खट्टर यांच्या रागाचा अनेकदा बळी झाला आहे.