Harassment While Playing Garba: गरबा खेळताना मुलीसबत छेडछाड, भांडणात 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Molestation While Playing Garba: हरियाणा राज्यातील फरिदाबाद यथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गरबा खेळताना शेजारील काही तरुणांनी मुलीचा विनयभंग करत तिची छेडछाड (Harassment While Playing Garba) करण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या वादावादीत एका 52 वर्षीय व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. फरिदाबाद (Faridabad) येथील सेक्टर 87 मध्ये मध्ये असलेल्या प्रिन्सेस पार्क सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. प्रेम मेहता असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्तीआणि त्यांचे कुटुंब सोमवारी रात्री निवासी संकुलाच्या आवारात गरबा कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच निवासी संकुलातील दोन तरुणांनी दांडिया नृत्यादरम्यान मेहता यांच्या 25 वर्षीय मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिला तिचा संपर्क क्रमांक विचारत तिला त्यांच्यासोबत नाचण्याची मागणी केली. तरुणांच्या मागणीला तरुणीने नकार दिला. मात्र, तरीही ते जबरदस्तीने तसेच वर्तन करत राहिले. त्रासदायक कृतीमुळे मेहता कुटुंब आणि त्या तरुणांमध्ये संघर्ष सुरू झाला.

गरबा खेळताना झालेल्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, गरबा उत्सवादरम्यान दोन्ही गट एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की करतआहेत. या गोंधळादरम्यान मेहता यांना धक्काबुक्की झाली. त्यांना पाठिमागे ढकलले गेले, ज्यामुळे ते जमिनीवर पडले आणि बेशुद्ध पडले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय उपचारांना यश आले नाही. त्यांनी मेहता यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून समाजामध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे.

मेहता कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचा छळ आणि 52 वर्षीय व्यक्तीवर शारीरिक अत्याचार करत हाणमार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत त्यांनी तसे आरोप नमूद केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी मेहता यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. पोलीस अधिकारी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून तपाससुरु केला आहे. पोलीस अधिकारी जमील खान यांनी या प्रकरणाची आणि या प्रकरणाच्या सुरू असलेल्या चौकशीला दुजोरा दिला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक तपशील पुढे येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही अलिकडील काळात वाढल्याचे पुढे आले आहे. प्रसारमाध्यमांनी काही दिवसांपूर्वीच दिलेल्या वृत्तामध्ये या वर्षी गुजरातमध्ये अवघ्या 24 तासांमध्ये 10 तरुणांचा मृत्यू गरबा खेळताना झाल्याचे म्हटले होते.