ती श्रीलंकन, तो भारतीय... पण नरेंद्र मोदी यांचे ट्विट लाईक केल्याने घडला मैत्री ते लग्नापर्यंतचा प्रवास
Hansini Edirisinghe & Govind Maheshwari Wedding (Photo Credit: ANI)

मध्य प्रदेशातील मंदसौर येथून एक अनोखी प्रेमकहाणी समोर येत आहे. एका गोष्टीमुळे देशाच्या सीमा ओलांडत प्रेमाचे हे नाते फुलले आहे. कुचडौद येथे राहणारा गोविंद (26) आणि श्रीलंकेची हंसनी (25) यांची सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरुन ओळख झाली. आता ही ओळख थेट लग्नापर्यंत येऊन पोहचली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंसनी आणि गोविंद हे दोघेही ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करतात. असेच एकदा गोविंदने मोदींच्या एका ट्विटला लाईक केले. त्याच ट्विटला हंसनीने देखील लाईक केले. त्यानंतर हंसनीचे प्रोफाईल चेक करुन गोविंदने तिला फॉलो करायला सुरुवात केली. त्यानंतर हंसनीने देखील त्याला फॉलो केले. अशीच हळूहळू मैत्री झाली. बोलणे वाढले आणि नकळत मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. 10 फेब्रुवारीला दोघांचाही विवाहसोहळा संपन्न झाला.

2017 मध्ये झाली ओळख

गोविंद मंदसौर जिल्ह्यातील कुचडौद येथील रहिवासी आहे. गोविंदने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर हंसनीने चंदीगड येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुरुवातील दोघेही टेक्स्ट मेसेज आणि व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असतं. त्यानंतर जुलै 2017 मध्ये हंसनी पहिल्यांदा भारतात आली तेव्हा गोविंद तिला रिसिव्ह करण्यासाठी दिल्ली एअरपोर्टवर गेला होता. त्यानंतर हंसनी गोविंदच्या कुटुंबियांना भेटली. कुटुंबियांना देखील हंसनी आवडली आणि दोघांचे लग्न ठरले. रविवारी हंसनी आणि गोविंद हिंदू परंपरेनुसार विवाहबद्ध झाले. विवाहसोहळ्यासाठी हंसनीच्या आई वडिलांसह तिचे कुटुंबिय श्रीलंकेतून भारतात दाखल झाले होते. लग्नानंतर गोविंद आणि हंसनी यांनी चंदीगड येथे राहण्याचा निर्णय घेतला आहे.