मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेर (Gwalior) पोलिसांनी चोरी (Thefts) करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. जेव्हा पोलीस ठाण्यात दोघांची चौकशी करण्यात आली, तेव्हा या चोरट्यांची कबुली ऐकून पोलीसही चकित झाले. आपल्या दिल्लीत असणाऱ्या गर्लफ्रेंडच्या मेकअप आणि कपड्यांसाठी हे भाऊ चोरी करायचे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांचे एकाच मुलीवर प्रेम आहे. दोघांनीही प्रेयसीचे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी चोरी केली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यापैकी मोठ्या भावाला स्मॅकचे तर लहान भावाला दारूचे व्यसन होते. दोघेही दारूच्या नशेत फिरायचे आणि नंतर रात्री चोरी करायचे. हे दोघे महागडे फोन आणि रोख रक्कम चोरायचे.
याबाबत एसडीओपी संतोष पटेल यांनी सांगितले की, बजरंग कॉलनी, डबका येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी मुनेश यांनी 31 ऑगस्ट रोजी हस्तिनापूर पोलीस ठाण्यात 16,000 रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि तीन मोबाइल फोन चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्याच दिवशी रात्री उटीला पोलीस ठाण्यातील सौसा येथील बबलू यादव यांच्या घराचे कुलूप तोडून मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची यंत्रणा कार्यान्वित केली.
या चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी हस्तिनापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकुमार राजावत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. पोलीस पथकाने तपासलेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांची ओळख पटवली. त्यानंतर हस्तिनापूर पोलीस स्टेशन प्रभारी यांनी गुप्त माहिती व सायबर सेलच्या मदतीने मेहगाव जिल्हा भिंड येथील रवी धानुक व विशाल धानुक या दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. (हेही वाचा: Mumbai: चोरीचा प्रयत्न फसला, 14 व्या मजल्यावरून पाय घसरून खाली पडल्याने चोरट्याचा मृत्यू, विक्रोळी येथील घटना)
त्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी हस्तिनापूर पोलीस ठाण्यात अनेकवेळा चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही भावांनी सांगितले की, आपण आपले अंमली पदार्थांचे व्यसन आणि गर्लफ्रेंडचा खर्च भागवण्यासाठी चोरी करत होतो. त्यांची दिल्लीत एक गर्लफ्रेंड आहे, तिचा मेकअप, कपडे आणि इतर खर्च भागवण्यासाठी त्यांनी चोरी करायला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपींकडून एक लाख रुपये किमतीची दुचाकी, सात अँड्रॉइड मोबाईल आणि तीन लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.