पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला ₹ 2 लाखांची अंतरिम भरपाई देण्यात यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने (District Consumer Dispute Redressal Forum) मंगळवारी गुरुग्राम महानगरपालिकेला (Municipal Corporation of Gurugram) दिले आहेत. हे प्रकरण ऑगस्ट महिन्यातील आहे. पाळीव कुत्र्याने एका महिलेवर हल्ला करुन तिला जखमी केले होते. त्यानंतर महिलेने ग्राहक विवाद निवारण मंचाकडे धाव घेतली होती. दरम्यान, एमसीजीची (MCG) इच्छा असेल तर भरपाईची रक्कम कुत्र्याच्या मालकाकडून वसूल केली जाऊ शकते, असेही मंचाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
घटनेबाबत माहिती अशी की, मुन्नी असे पीडितेचे नाव आहे. ती घरकाम करुन उदरनिर्वाह करते. मुन्नी ही वस्तीत घरकाम करण्यासाठी आपल्या मेहुणीसोबत 11 ऑगस्ट रोजी निघाली असताना विनित चिकारा नामक व्यक्तीच्या पाळीव कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला होता. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात (चाव्यात) तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला गुरुग्रामच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (हेही वाचा, Dog Attack Continues in Noida: नोएडात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम, गोल्डन पाम्प सोसायटीत मुलीवर हल्ला (Watch Video))
सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये कुत्र्याच्या जातीचा उल्लेख 'पिटबुल' (Pitbull) असा करण्यात आला आहे. नंतर मालकाने ही जात 'डोगो अर्जेंटिनो' (Dogo Argentino) असल्याची माहिती दिली. ग्राहक मंचाने एमसीजीला कुत्रा ताब्यात घेण्याचे निर्देश दिले . तसेच, चिकारा (मालक) याचा कुत्रा पाळण्याचा परवाना तातडीने रद्द केला.
ग्राहक मंच इतक्यावरच थांबला नाही तर, त्यांनी एमसीजीला पाळीव कुत्र्यांसाठी तीन महिन्यांत धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, "न्यायाच्या दृष्टीकोणातून रुपेय 2 लाखांची रक्कम MCG द्वारे अंतरिम मदत आणि भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. पीडिता ही अत्यंत गरीब आहे. तिच्यावर ओढावलेली परिस्थीती पाहता तिला या नुकसानभरपाईची गरज असल्याचेही मंचाने म्हटले.