गुरुग्राम: शाळेच्या पार्टीत उशिरापर्यंत थांबणाऱ्या शिक्षिकेवर पतीकडून गोळीबार
Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

शाळेच्या पार्टीत रात्री उशिरापर्यंत थांबणाऱ्या शिक्षिकेवर पतीने थेट पार्टीत जावून गोळीबार केल्याची घटना गुरुग्राम येथून समोर आली आहे. या गोळीबारात शिक्षिका जखमी झाली आहे. आशा रानी असे या शिक्षिकेच नाव ती काही महिन्यांपूर्वीच या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शो मध्ये तिने सहभाग घेतला होता. सध्या आशा रानीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालू असताना तिचा पती तिला घरी घेऊन जाण्यासाठी आला. मात्र तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्या रागात पतीने बंदूक काढत मोठ्या स्क्रीनच्या दिशेने गोळी झाडली. नंतर पत्नीच्या पायावर गोळीबार करत तेथून फरार झाला.

फॅशन शो मध्ये सहभागी होण्यास आशा रानीच्या पतीचा विरोध होता. रविवारी रात्री ११.३०च्या सुमारास पती इंद्रजीत शाळेजवळ गेला असता शाळा बंद होती. त्यामुळे आशा आपल्याशी खोटं बोलल्याचा राग त्याला आला. त्यानंतर फोनवर तिने इंद्रजीतची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पार्टी चालू असलेल्या ठिकाणाचा फोटोही व्हॉट्स अॅपवर पाठवला. त्यानंतर मात्र इंद्रजीत पार्टीच्या ठिकाणी पोहचला आणि आशाला तेथून निघण्यास सांगू लागला. मात्र याला आशाने विरोध केल्याने त्याने गोळीबार करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

आशा आणि आरोपी इंद्रजीत यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले असून इंद्रजीतची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.