Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

गुजरातमधून (Gujarat) मानवी तस्करीचे (Human Trafficking) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका मुलीची 2015 पासून म्हणजेच साधारण 8 वर्षांपासून अनेक पुरुषांना वधू म्हणून विक्री झाली आहे. ही मुलगी जेव्हा 13 वर्षांची होती तेव्हा तिची पहिल्यांदा विक्री झाली. त्यानंतर पुढील 8 वर्षे साधारण 30 ते 45 वयोगटातील किमान 15 पुरुषांना 2 ते 2.5 लाख रुपयांत तिची विक्री झाली. या मुलीवर मदतीचा दबाव टाकत टोळीने इतर मुलींचे अपहरण करून त्यांचीची अशीच विक्री केली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, मानवी तस्करी करणारी टोळी गुजरातमध्ये कार्यरत आहे आणि अल्पवयीन मुलांची विक्री आणि अपहरण करण्यात गुंतलेली आहेत. महत्वाचे म्हणजे, 2015 मध्ये रॅकेट सुरू झाल्यापासून अपहृत झालेल्या 8 पैकी फक्त एका मुलीची सुटका करण्यात आली.

माहितीनुसार, अहमदाबादजवळील कानभा येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीबाबत पोलिसांना तक्रार मिळाली होती. या मुलीचा शोध घेताना अहमदाबाद ग्रामीण पोलिसांनी 11 मे रोजी मानवी तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला. पोलिसांनी 13 मे रोजी गांधीनगरच्या बाहेरील गावातून या मुलीची सुटका केली. तिच्याकडूनच पोलिसांना मानवी तस्करीबाबत माहिती मिळाली. या मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी प्रकरणातील मुख्य सूत्रधार अशोक पटेल, त्याची पत्नी रेणुका, त्याचा मुलगा आणि रुपल मेकवान नावाच्या आणखी एका महिलेची भूमिका निश्चित केली. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली.

हे सर्वजण शहराच्या ओढव जिल्ह्यात राहत होते. त्यांच्या काही साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. या मुलीने दिलेल्या माहितीनुसार अशोक पटेल हा गुजरातसह महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये साथीदारांसह कार्यरत होता. या प्रकरणातील सर्वात पहिली मुलगी निशा (नाव बदलले आहे) असल्याचा पोलिसांना संशय आहे. निशाची 2015 मध्ये ती फक्त 13 वर्षांची असताना पहिल्यांदा ‘वधू’ म्हणून विक्री झाली. माहितीनुसार, अशोक पटेलने अहमदाबादमधून निशाचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार व अत्याचार केला. त्यानंतर त्याने व इतर टोळीतील सदस्यांनी तिला ‘वधू’ म्हणून विकण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: भावाने गर्भधारणा केलेल्या 15 वर्षीय मुलीचा 7 महिन्यांचा गर्भ पाडण्याची केरळ उच्च न्यायालयाने दिली परवानगी)

निशाला 2015 पासून दरवर्षी 30 ते 45 वयोगटातील किमान दोन पुरुषांशी लग्न करण्यास भाग पाडले जात होते. निशावरच मदतीचा दबाव टाकून इतर मुलींचे अपहरण केले गेले. आता पोलीस निशा व इतर मुलींचा शोध घेण्यात गुंतले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.