Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Elections 2022) वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग (ECI) आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. गुजरातमधील (Gujarat ) विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. एकूण 68 जागा असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा आयोगाने काही दिवसांपूर्वीच केली होती. तेव्हापासूनच गुजरात विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याबाबत उत्सुकता होती.

सन 2017 मध्ये, हिमाचल निवडणुकीच्या तारखांच्या दोन आठवड्यांच्या आत गुजरातच्या निवडणुका जाहीर झाल्या. दोन्ही राज्यांसाठी 18 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली होती. तर, या वर्षी, ECI ने एकाच वेळी उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमधील निवडणुका जाहीर केल्या. गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या समाप्तीमध्ये 60 दिवसांचे अंतर होते, तरीही निवडणुका एकत्रित झाल्या.

काँग्रेसने गेल्या महिन्यात निवडणूक आयोगावर आरोप केला की निवडणूक आयोग अन्यायाने वागते आहे. ते सरकारला फायदा होईल अशी पूरक भूमिका घेत आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर टीका करत केलल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “... पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांना काही मोठी आश्वासने देण्यासाठी आणि आणखी काही उद्घाटने पार पाडण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठीच निवडणूक आयोग असे वर्तन करत आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही,” असे काँग्रेसचे जयराम रमेश यांनी ट्विट केले. (हेही वाचा, Bye Election 2022: अंधेरी पूर्वसह देशभरात 7 राज्यांमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्षांचा सामना)

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, हिमाचलसह गुजरातच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर न करण्यामध्ये कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही. “दोन राज्यांच्या(हिमाचल प्रदेश आणि गुजरात) विधानसभांच्या समाप्तीमध्ये 40 दिवसांचे अंतर आहे. नियमांनुसार, तो किमान 30 दिवसांचा असावा जेणेकरून एका निकालाचा दुसऱ्यावर परिणाम होणार नाही,” असे कुमार हिमाचलच्या निवडणुकीची घोषणा करण्यासाठी दिलेल्या मीडिया ब्रीफिंगमध्ये म्हणाले. कुमार म्हणाले की, निवडणुकांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यामागे हवामानासारखे घटक कारणीभूत आहेत. "आम्हाला हिमाचलच्या निवडणुका बर्फ पडण्यापूर्वी घ्यायच्या आहेत. "उल्लेखनीय असे की, दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे.