Ancient Gold Coins Representation image (PC - pixabay)

हिंदु संस्कृतीनुसार साडेतीन मुहूर्तांमध्ये समावेश केल्या जाणार्‍या अक्षय्य तृतीयेचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 3 मे दिवशी अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) आहे. भारतीय या सणाचं औचित्य साधत अनेक मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. सोनं त्यापैकीच एक. अक्षय्य तृतीया हा शुभ मुहूर्त असल्याने अनेकजण या दिवशी लक्ष्मीच्या रूपात सोनं-चांदी घरी घेऊन जातात. सध्या लग्नसराई सुरू असल्याने आणि अक्षय्य तृतीया जवळ येत असल्याने त्याचा परिणाम सराफा दुकानातही होत आहे. सराफा दुकानांमध्ये आज सोन्या,चांदीच्या विविध वस्तूंची, दागिन्यांची मोठी उलाढाल होण्यास सुरूवात झाली आहे. मग यंदा अक्षय तृतीयेला तुम्ही देखील एखादा दागिना विकत घेण्याच्या विचारात असाल तर पहा आज काय आहे सोन्याचा दर? नक्की वाचा: Akshaya Tritiya 2022 Date: अक्षय्य तृतीया यंदा 3 मे दिवशी; जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व.

सोन्याचे, चांदीचे दर काय ?

आज Goodreturns च्या माहितीनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळे (10 ग्रॅम) साठी 48,550 आहे. तर 24 कॅरेट साठी हाच दर 52,960 रूपये आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे 24 कॅरेट सोन्याची निवड करतात तर दागिन्यांसाठी 22,23 कॅरेट सोनं निवडलं जातं.

सोन्याप्रमाणे चांदी च्या वस्तू खरेदीकडेही अनेकांचा कल असतो. चांदीचा दर आज भारतामध्ये प्रतिकिलो ₹64,000 आहे. कालच्या तुलनेत आज सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पहायला मिळाली आहे.

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या वायद्यात सकाळी सुमारे 0.56 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव 353 रुपयांनी वाढून 51,615 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर सकाळी चांदीच्या वायद्यात 0.44 टक्क्यांनी वाढ झाली आणि चांदी 433 रुपयांनी महागून 64,350 रुपये प्रति किलो झाली.