कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे जगभरात विविध व्यवसायात मंदी आली आहे, मात्र सोने चांदी (Gold- Silver Rate Today) व्यवसाय हा मागील काही दिवसांपासून चांगलाच भरभराटीत असल्याचे दिसून आले आहे. आज, 15 एप्रिल रोजी सोने बाजारात मागील 7 वर्षातील उच्चांकी दर पाहायला मिळाले. आज प्रति 10 ग्राम सोन्याच्या मागे तब्बल 46 हजार 600 रुपये इतका भाव आहे तर सोन्या सोबतच चांदीच्या दरात देखील तेजी कायम आहे, आज प्रति किलो चांदी मागे 43 हजार 500 असा दर आहे. सोने व्यवसायात तेजी येण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे सर्व व्यवसाय बंद असताना गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय म्हणून अधिक जनता ही सोन्याला प्राधान्य देत आहे. तसेच यंदा 26 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा (Akshay Tritiya) सण आहे, साधारण आठव्याभर आधीपासूनच सोने आणि चांदी व्यसाय तेजीत पाहायला मिळतो. त्यामुळे हे वाढीव भाव आहेत असे दिसून येते.
दुसरीकडे, सोन्यातील गुंतवणुकीत असणारी तेजी पाहता आता 20 एप्रिल पासून रिझर्व्ह बँक (RBI) आणि केंद्र सरकारच्या विद्यमाने सॉव्हेन गोल्ड बाँड स्कीम 2020-21 (Sovereign Gold Bond Scheme) लागू करण्यात येईल असे समजतेय. ही स्कीम म्हणजेच नागरिकांना प्रत्यक्ष सोन्याचे वस्तूऐवजी बॉण्ड मध्ये पैसे गुंतवता येणार आहेत. जाणून घ्या या स्कीम विषयी सविस्तर
दरम्यान, आज भारतीय शेअर बाजार सुद्धा वाढीव अंकांनी सुरु झाले. आज सेन्सेक्स 522 अंकांनी वर येऊन 31,212 वर व्यापार सुरु होता तर दुसरीकडे निफ्टी 155 अंकांनी वाढून 9,148 वर होता.