GOA Election Results 2022: गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीला 'नोटा'पेक्षाही कमी मते, भाजपने उडवली खिल्ली
Shiv Sena, NCP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गोवा विधानसभा निवडणुकीत (GOA Election Results 2022) भाजप (BJP) पुन्हा एकदा सत्तेत येताना दिसत आहे. तर काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागणार असे दिसते. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षासाठी गोवा राज्याचे निकाल फारच धक्कादायक लागले आहेत. हे निकाल या दोन्ही पक्षांसाठी इतके धक्कादायक आहेत की, ज्याची या पक्षाने कल्पनाही केली नव्हती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळून 'नोटा'पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थलावर दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षाला 0.25% तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्यातरी 1.06% इतके मतदान झाल्याचे दिसते. ही आकडेवारी वाढू शकते. मात्र, सध्याची स्थिती तशी आहे.

GOA Election Results 2022: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब (Punjab Election Results), गोवा (Goa Election Results), उत्तरप्रदेश (Uttar Pradesh Election Results), उत्तराखंड (Uttarakhand Election Results) आणि मणिपूर (Manipur Election Results) या पाच राज्यांचा समावेश आहे. या निवडणुकांमध्ये खासकरुन गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मत वाटा मिळालाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे 'नोटा'ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. 1.17% मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला आहे. (हेही वाचा, Uttar Pradesh Elections Results 2022: प्रियंका गांधी यांनी काम करुनही उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का, काय असतील कारणे?)

'एक मासो आणि खंडी भर रस्सो!'

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली मतांची एकूण टक्केवारी पाहून भाजपने या दोन्ही पक्षांवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना, भाजपवर टीका करताना भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, ' इसवीसन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार. उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो. उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा...झंझावाती दौरा. सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले...अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल

हारले. एक मासो आणि खंडी भर रस्सो!'

अॅड. आशिष शेलार यांनी पुढच्या महिन्यात म्हटले की, 'मुंबई बेहाल करून दिल्लीचे दिव्य स्वप्न बघणारे एकदा फक्त जमीनीवरची वस्तूस्थिती बघा. गोवा निकाल निवडणूक आयोगाच्या बेवसाईटनुसार सकाळी 11.30 वाजता. नोटा : 6439 मते (1.1%), राष्ट्रवादी काँग्रेस : 5058, शिवसेना : 1099 (0.2%), दोन्ही मिळून : 6157 (1%)'

ट्विट

दरम्यान,उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena In Uttar Pradesh and Goa Election) अत्यंत निराशाजनक कामगिरी करताना दिसते आहे. उत्तर प्रदेश आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये शिवेसेनेने (Shiv Sena) मोठा गाजावाजा करत उमेदवार रिंगणात उतरवले होते. तसेच, पक्षाचा स्टार चेहरा असलेल्या आदित्य ठाकरे यांनाही शिवसेनेने प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. मात्र, असे असूनही शिवसेनेला दोन्ही राज्यांमध्ये पाय रोवता आलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना दोन्ही राज्यांमध्ये मोठे यश मिळवेल असा दावा केला होता. मात्र, हा दावा कोणत्याही प्रकारे वास्तवात उतरताना दिसत नाही.