Amit Shah | (Photo Credit: ANI)

केंद्र सरकारने शनिवारी गुड गव्हर्नन्स इंडेक्स (GGI) 2020-21 जारी केला. या गुड गव्हर्नन्स इंडेक्समध्ये गुजरात (Gujrat) पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र (Maharashtra) दुसऱ्या तर गोवा (Goa) तिसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत दिल्ली अव्वल आहे. 2019 मध्ये जाहीर झालेल्या अंतिम निर्देशांकात गुजरातने यावर्षी 12% पेक्षा जास्त आणि गोव्याने सुमारे 25% ची वाढ नोंदवली आहे. निर्देशांकानुसार, 20 राज्यांनी 2021 या वर्षासाठी एकूण जीजीआय गुणांमध्ये सुधारणा केली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी काल सुशासन दिनानिमित्त विज्ञान भवनात प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) द्वारे तयार केलेल्या GGI-2021 चे प्रकाशन केले. यावेळी बोलताना राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की जी जीआयमुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाचे मूल्यांकन करण्यात मदत मिळेल. दरवर्षी 25 डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. जीजीआय-2021 नुसार, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा ही राज्ये 10 क्षेत्रातील निर्देशकांच्या एकत्रित क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत.

ही 10 क्षेत्रे म्हणजे कृषी आणि संबंधित क्षेत्र, वाणिज्य आणि उद्योग, मानव संसाधन विकास, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उपयुक्तता, आर्थिक सुशासन, सामाजिक कल्याण आणि विकास, न्यायिक आणि सार्वजनिक सुरक्षा, पर्यावरण आणि नागरिक केंद्रित प्रशासन, अशी आहेत. जीजीआय-2021 मध्ये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गट A, गट B, ईशान्य आणि डोंगराळ राज्ये, केंद्रशासित प्रदेश अशा चार श्रेणींमध्ये विभागून क्रमवारी देण्यात आली आहे.

गुजरातने आर्थिक प्रशासन, मानव संसाधन विकास, सार्वजनिक पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण आणि विकास, न्यायिक आणि सार्वजनिक सुरक्षा यांमध्ये चांगली कामगिरी केली, तर महाराष्ट्राने कृषी आणि संलग्न क्षेत्रे, मानव संसाधन, सार्वजनिक पायाभूत सुविधा, समाज कल्याण आणि विकास या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली. गोव्याने कृषी आणि संबंधित क्षेत्रे, वाणिज्य आणि उद्योग, सार्वजनिक पायाभूत सुविधा, आर्थिक प्रशासन, सामाजिक कल्याण आणि विकास आणि पर्यावरणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.