
कानपूर (Kanpur) मध्ये एका पाळीव कुत्र्याने मालकीणीवरच जीवघेणा हल्ला केल्याचा हृदय द्रावक प्रकार समोर आला आहे. हा कुत्रा जर्मन शेफर्ड (German Shepherd) प्रजातीचा होता. त्याने आपल्या 91 वर्षीय मालकीणीवर हल्ला केला आणि तिचे लचके तोडले. हल्ल्यानंतर सुमारे 2 तास ही महिला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली होती. पोलिसांनी या घटनेनंतर पाळीव कुत्र्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना 14 मार्च दिवशी कल्याणपूरच्या विकास नगर भागात घडली आहे.
विकास नगर मध्ये 91 वर्षीय वृद्ध मोहिनी त्रिवेदी आपली सून किरण आणि नातू धीर प्रशांत त्रिवेदी सोबत राहत होता. नातवाने घरात जर्मन शेफर्ड कुत्रा पाळला होता. या घटनेच्या आठवडाभर आधीच मृत महिलेच्या नातू आणि सुनेला फ्रॅक्चर झाले होते त्यामुळे दोघेही आपल्या खोलीत आराम करत होते. काही कामासाठी वृद्ध महिला अंगणात आली तेव्हा कुत्रा भुंकायला लागला. तिने त्याला काठीने हटकलं पण यावर कुत्रा चौताळला. कुत्र्याने हल्ला करत तिच्या चेहर्यावर, पोटावर हल्ला करत तिचे लचके तोडले.
सून आणि नातवाने हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून आजुबाजूचे देखील जमले. पोलिसांना प्रकार कळवल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. वृद्ध महिलेला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी जर्मन शेफर्ड कुत्र्याला रेस्क्यू सेंटर मध्ये पाठवलं आहे. मात्र आजीचा जीव घेणार्या कुत्र्याची कस्टडी नातवाने पुन्हा मागितली आहे.