Jio Platform मध्ये General Atlantic ची तब्बल 6,598.38 कोटींची गुंतवणूक; एका महिन्यात जिओमध्ये 4 विदेशी कंपन्यांची Investment
Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या वेळी जेव्हा संपूर्ण देशात व्यवसाय ठप्प झाले आहेत, तेव्हा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे एकमेव उद्योगपती आहेत ज्यांनी तीन आठवड्यांत तीन डील्सवर सह्या केल्या आहेत. या द्वारे त्यांनी कंपनीसाठी 60 हजार कोटी रुपयांचा मोठा निधी जमा केला आहे. काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आणखी दोन कंपन्या जिओमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करु शकतील असे वृत्त होते. आता पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जनरल अटलांटिक (General Atlantic) ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये (Jio Platforms) तब्बल 6,598.38 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याद्वारे ही कंपनी जिओमधील 1.34 टक्के भागभांडवल विकत घेईल.

केवळ एका महिन्यात जिओ प्लॅटफॉर्ममध्ये परदेशी कंपन्यांनी केलेली ही चौथी मोठी गुंतवणूक आहे. याआधी फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स आणि व्हिस्टा इक्विटी पार्टनर यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली होती. आता जनरल अटलांटिकसोबतच्या करारामुळे जिओ प्लॅटफॉर्मने मागील एका महिन्यात एकत्रितपणे 67,000 रुपयांहून अधिक वाढ केली आहे. जनरल अटलांटिकने यापूर्वी एअरबीएनबी इन्क. (Airbnb Inc.) आणि उबर टेक्नॉलॉजीज इंक. (Uber Technologies Inc.) यांना मदत केली होती.

एप्रिलमध्ये फेसबुक इन्क. ने डिजिटल युनिटमधील 10% भागभांडवलासाठी 5.7 अब्ज डॉलर्स देण्याचे मान्य केले. तर सिल्व्हर लेक पार्टनर्स आणि व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सनी गेल्या आठवड्यात सांगितले की, ते एकूण 2.25 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जिओमध्ये करतील. तंत्रज्ञान, ग्राहक, वित्तीय सेवा आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील गुंतवणूकीचा 40 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड असलेली, जनरल अटलांटिक ही अग्रगण्य अशी जागतिक ग्रोथ इक्विटी फर्म आहे. (हेही वाचा: जनधन योजनेअंतर्गत 20 हजार 225 कोटी खात्यात जमा करण्यात आले असून गरिब, गरजूंना तातडीने आर्थिक मदत- अर्थमंत्री निर्मला सीतारमण)

याबाबत बोलताना, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, 'एक महत्वाचे भागीदार म्हणून जागतिक गुंतवणूकदार जनरल अटलांटिकचे स्वागत करण्यात मला आनंद होत आहे. मी जनरल अटलांटिक यांना कित्येक दशकांपासून ओळखत आहे आणि आता भारताच्या विशाल वाढीच्या संभाव्यतेवरच्या त्यांच्या विश्वासाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.'