कमाईच्या बाबतीत Gautam Adani यांनी Elon Musk, Jeff Bezos यांनाही टाकले मागे; नेट वर्थच्या वाढीबाबत ठरले अव्वल
Gautam Adani, Chairman, Adani Group (Photo Credits-ANI)

काही दिवसांपूर्वी हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2021 (Hurun Global Rich List 2021) जाहीर झाली, ज्यामध्ये देशाला 40 नवीन अब्जाधीश मिळाल्याचे नमूद केले होते. तसेच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात श्रीमंत आठव्या क्रमांकाची व्यक्ती ठरल्याचेही सांगितले होते. आता अजून एका भारतीय व्यावसायिकाने एक नवीन विक्रम स्थापन केला आहे. यावर्षी भारतीय व्यावसायिक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीमध्ये जितकी वाढ झाली आहे, तितकी वाढ जगातील कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये झाली नाही. याबाबत अदानी यांनी एलोन मस्क (Elon Musk) आणि जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनाही मागे टाकले आहे.

यामागे अदानी यांच्या बंदरापासून ते उर्जा प्रकल्पांवर गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास हे कारण आहे, ज्यामुळेच अडाणी यांच्या झोळीत करोडो रुपये पडले. Bloomberg Billionaires Index नुसार, 2021 च्या काही महिन्यांत अदानी यांची संपत्ती 16.2 अब्ज डॉलर्सवरून वाढून 50 अब्ज डॉलरवर गेली. या कालावधीत, एमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांना मागे टाकत, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी सर्वात जास्त कमाई करणारे व्यक्ती बनले. (हेही वाचा: कोरोना व्हायरस महामारीमध्ये भारताला मिळाले 40 नवे अब्जाधीश; Mukesh Ambani ठरले जगातील सर्वात श्रीमंत आठव्या क्रमांकाची व्यक्ती)

शेअर बाजारामध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर,  यावर्षी अदानी टोटल गॅस लि. स्टॉक 96 टक्के, अदानी एंटरप्राईजेस मध्ये 90 टक्के, अदानी ट्रान्समिशन लि. मध्ये 79 टक्के, अदानी पॉवर लि. आणि अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. मध्ये 52 टक्के वाढ झाली आहे. अदानी ग्रीन एनर्जी लि. मागील वर्षी 500 टक्के बाउन्स झाला आणि यावर्षी आतापर्यंत त्यामध्ये 12 टक्के वाढ झाली आहे. अशाप्रकारे भारतातील बंदरे, विमानतळ, डेटा सेंटर आणि कोळशाच्या खाणींना जोडून अदानी आपल्या समूहाचा विस्तार वेगाने करीत आहेत.