‘देव तारी त्याला कोण मारी’, ही म्हण गुजरातच्या सुरतमध्ये (Surat) खरी ठरली आहे. सुरतच्या डुमास (Dumas) समुद्रकिनारी शुक्रवारी समुद्रात बुडून बेपत्ता झालेला तरुण तब्बल 36 तासांनंतर जिवंत सापडला आहे. शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी सुरत येथे राहणारा लखन नावाचा 13 वर्षीय मुलगा आपल्या आजी व भावंडांसह अंबाजी मंदिरात दर्शनासाठी आला होता. मंदिरात गेल्यावर मुलांनी आजीकडे समुद्रकिनारी जाण्याचा हट्ट सुरू केला. त्यानंतर आजी त्यांना डुमास बीचवर फिरायला घेऊन गेली. हे सर्वजण डुमस समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जन पाहत होते व त्यानंतर लखन आपल्या भावासोबत समुद्रात पोहायला गेला.
यावेळी लाटांचा जोर इतका होता की, लखन आणि त्याचा भाऊ स्वतःला सावरू शकले नाहीत व ते समुद्रात बुडू लागले. तिथे जमलेल्या लोकांनी या दोघांना बुडताना पहिले. यावेळी लखनच्या भावाला वाचवण्यात यश आले. मात्र लखन समुद्रात बेपत्ता झाला.
लाटांच्या तडाख्यात लखन वाहून गेल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. खूप शोधाशोध करूनही लखन सापडला नाही. दुसऱ्या दिवशीही प्रशासन आणि कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरूच ठेवला, मात्र हाती निराशा आली. त्यानंतर अचानक 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लखनचे वडील विकास देवीपूजक यांचा नवसारी येथून फोन आला व लखनला नवसारी समुद्रात मच्छिमारांनी वाचवल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. लखनचे कुटुंबीय नवसारी येथे पोहोचले तेव्हा त्यांना लखन जिवंत आणि पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळले. त्याला दुखापतही झाली नव्हती. (हेही वाचा: इंडिगो पॅसेंजरने आपत्कालीन एक्झिट दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, आरोपीला अटक)
आपल्या बोटीतून सुमारे 8 मच्छिमार समुद्रात मासेमारी करत होते. तेव्हा त्यांना कोणीतरी काठीच्या साहाय्याने तरंगत असून मदत मागत असल्याचे दिसले. त्यानंतर मच्छीमार या मुलापर्यंत पोहोचले व त्याला वाचवले. मुलाकडे चौकशी केली असता त्याने सर्व माहिती दिली. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून लखनला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले गेले. लखन समुद्रात वाहून गेल्यावर विसर्जन झालेल्या गणेशमूर्तींच्या मदतीने तो इतके तास समुद्रात तरंगत राहिला होता. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील हेही लखन यांना भेटण्यासाठी आले होते.