माजी मंत्री व महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते मुकुल वासनिक 60 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात; रवीना खुराना यांच्याशी बांधली लग्नगाठ (Photo)
मुकुल वासनिक विवाहबंधनात (Photo Credit : Twitter

कॉंग्रेस (Congress) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री मुकुल वासनिक (Mukul Wasnik) विवाहबंधनात अडकले आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी रवीना खुराना (Ravina khurana) यांच्याशी लग्नगाठ बांधली. आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी वासनिक यांच्या लग्नाची माहिती दिली. ट्वीटरवर याबाबतचे काही फोटो पोस्ट करत तिवारी यांनी मुकुल वासनिक यांचे अभिनंदन केले आहे. मनीष तिवारी हे नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी पत्नी नाझनीनसमवेत पोहचले होते. त्यांनी ट्विटरवर हा खास क्षण शेअर केला आहे. अशोक गेहलोत यांनीही वासनिक यांचे अभिनंदन केले आहे.

या भेटीबद्दल मनीष तिवारी लिहितात, 'मी मुकुल वासनिक यांना 1984 साली पहिल्यांदा भेटलो होतो, तर रविना यांची भेट 1985 मध्ये, मॉस्को येथे वर्ल्ड फेस्टिव्हल ऑफ युथ अँँड स्टुडंंट्समध्ये झाली. आता हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत, त्या दोघांसाठी मी खूप खुश आहे. त्यांच्यावर देवाचा सदैव आशीर्वाद असो.'

कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी या लग्नाबद्दल, मौर्य शेराटन, दिल्ली येथे दुपारचे जेवण आयोजित केले होते. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतही त्या ठिकाणी पोहचले व त्यांनी वासनिक यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. या लंच पार्टीसाठी अहमद पटेल, अंबिका सोनी आणि आनंद शर्मा यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. (हेही वाचा: महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी Sonia Gandhi यांना घातली 'ही' भीती; म्हणूनच शिवसेनेसोबत बोलणी करायला त्यांनी दाखवली तयारी)

राहुल गांधींनी अचानक कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर, मुकुल वासनिक हे नवे अध्यक्ष होण्याविषयी माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. मात्र, पुन्हा सोनिया गांधी यांना पक्षाची कमान हाती देण्यात आली. दरम्यान मुकुल वासनिक हे महाराष्ट्रातील दिग्गज कॉंग्रेस नेते आणि तीन वेळा खासदार बाळकृष्ण रामचंद्र वासनिक यांचे पुत्र आहेत. मुकुल वासनिक हे 1984-1986 दरम्यान भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले. नंतर ते 1988-1990 दरम्यान भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. याआधी वासनिक यांनी बुलढाना येथून पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. 1984 मध्ये ते वयाच्या 25 व्या खासदार झाले होते.