भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे सहा स्थान वर आले आहेत. या यादीत त्यांचा 13 वा क्रमांक आहे. तर जेफ बेजोस यांनी यादीत पहिले स्थान पटकावले आहे. तर मार्क झुकरबर्ग यांचे गेल्या वर्षीच्या यादीतील पाचवे स्थान होते. आता ते खालावले असून ते आठव्या क्रमांकावर आले आहे.
अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस यांनी यादीत आपले प्रथम स्थान टिकवून ठेवले आहे. तर बिल गेट्स आणि वारेन बफेट हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर आहेत. बेजोस यांच्या संपत्तीत 19 अरब डॉलरने वाढ झाली असून आता त्यांची संपत्ती सुमारे 131 अरब डॉलर म्हणजेच 9.2 लाख कोटी रुपये इतकी आहे.
मुकेश अंबानी यांची संपत्ती इतक्या कोटींनी वाढली
तर मुकेश अंबानी यांच्या संपत्ती 2018 मध्ये 40.1 अरब डॉलर होती. त्यात वाढ होऊन आता त्यांची संपत्ती 50 अरब डॉलर म्हणजेच 3.5 लाख कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी मुकेश अंबानी या यादीत 19 व्या स्थानावर होते. यंदा मात्र संपत्तीत वाढ झाल्याने त्यांनी यादीत 13 वे स्थान पटकावले आहे. तर मुकेश अंबानींचे भाऊ अनिल अंबानी यांची या यादीतील स्थानात घसरण झाली असून ते आता 1349 व्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानींचे स्थान वाढण्याबरोबर 2017 च्या फोर्ब्सच्या यादीत त्यांना ग्लोबल गेम चेंजरचा दर्जा देण्यात आला होता.
भारतातील इतर उद्योगपतींचे स्थान
फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत विप्रो कंपनीचे अझीम प्रेमजी 36 व्या स्थानावर आहेत. 22.6 अब्ज डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. तर आर्सेलर कंपनीचे चेअरमन आणि सीईओ लक्ष्मी मित्तल यांचे या यादीत 91 वा क्रमांक आहे. त्याचबरोबर आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष मंगलकुमार बिर्ला हे 122 व्या स्थानावर आहेत. तर अदानी समुहाचे संस्थापक अध्यक्ष गौतम अदानी यांचे या यादीत 167 वे स्थान आहे.
पतंजलि आयुर्वेद सहसंस्थापक आचार्य बालकृष्ण हे 365 व्या स्थानावर असून पीरामल एंटरप्राइजेजचे अध्यक्ष अजय पीरामल यांचा या यादीत 436 वा क्रमांक लागतो. बायोकॉनचे संस्थापक किरण मजूमदार-शॉ हे 617 व्या स्थानी आहेत तर इंफोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती हे 962 व्या स्थानावर आहेत.