धक्कादायक! स्मार्टफोन आणि सोन्याच्या साखळीचा शौक पूर्ण करण्यासाठी पित्याने विकले पोटच्या 8 दिवसांच्या मुलीला
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : You Tube)

स्क्रीन टच मोबाईल आणि सोन्याच्या चेनची आवड असणाऱ्या बापाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या 8 दिवसांच्या मुलीला विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील अरुगमपट्टी इथे ही घटना घडली आहे. येसुरुधराज असे याचे कलयुगी बापाचे नाव असून तो रोजंदार म्हणून काम करतो. 8 नोव्हेंबरला आरोपीची पत्नी पुष्पलताने स्थानिक रुग्णालयात एक मुलगा आणि मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला. मात्र तिला याची कल्पनाच नव्हती की आपला पती आपल्या मुलीच्या भविष्यासाठी एक वेगळी योजना आखत आहे.

या आरोपी बापाला मुलगी नको होती, त्याला फक्त मुलगा ठेवायचा होता. याच कारणामुळे त्याने या नवजात मुलीला विकायची योजना आखली. तीन स्थानिकांच्या मदतीने त्याने मुलीला विकले, या गोष्टीची कोणालाही खबर लागू दिली नाही. मुलीची विक्री एकूण 1,80,000 रुपयांना केली गेली. त्यापैकी तीन दलालांना 80 हजार रुपये विभागून उर्वरित रक्कम या पित्याला मिळाली. मुलगी विकली गेल्याचे बायकोला काहीच माहित नव्हते. हे सर्व घडल्यानंतर काही तासांनी आरोपीने आपल्या नवजात मुलासाठी सोन्याची साखळी विकत घेतली. तसेच स्वतःसाठी स्क्रीन टच मोबाईल, मोटरसायकल आणि सायकलही आणली. (हेही वाचा: मात न तू वैरी: अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या 9 महिन्यांचा मुलाला आईने विकले; अडीच लाखाला पार पडला सौदा)

इकडे मुलगी गायब झाल्याचे पत्नीच्या लक्षात आले तर दुसरीकडे विकत घेतलेल्या वस्तूंमुळे आपला पती खुश आहे हे पाहून तिला संशय आला. तेव्हा तिने रुग्णालयातच पतीबरोबर भांडण सुरू केले. याच दरम्यान मुलीच्या बेपत्ता होण्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला समजली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना ही गोष्ट सांगितली. पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी चौकशी केली व या पित्याने आपली मुलगी विकली असल्याची बाबा  समोर आली. पोलिसांनी मुलगी विकल्याच्या आरोपाखाली वडिलांना ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.